धुलीकणरोधकांमुळे हवेतील प्रदूषण कमी होणार
वाहनांची वाढती वर्दळ, रस्त्यांची कामे, नवनवीन बांधकामे या कारणांमुळे वाढत्या प्रदूषणाला तोंड देत असलेल्या ठाणेकरांना येत्या काळात काही प्रमाणात शुद्ध श्वास घेता येणार आहे. ठाण्यातील वायूप्रदूषणाची पातळी उंचावण्यास हवेतील धुलीकणांचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आल्याने महापालिकेने शहरात २०० ठिकाणी प्रदूषण नियंत्रक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या नियंत्रकांमुळे नागरिकांच्या आरोग्यास बाधक ठरत असलेल्या हवेतील धुलीकणांची मात्रा ३० ते ४४ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकेल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
ठाणे शहरात गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात गृहसंकुले उभी राहिली आहेत. तसेच आजही अनेक भागांत मोठय़ा प्रमाणावर बांधकामे उभी राहत आहेत. वाढत्या नागरीकरणामुळे शहरातील रस्त्यांवर वाहनांची संख्या प्रचंड वाढली असून या वाहनांमुळे शहरातील प्रदूषणात वाढ झाल्याची ओरड शहरात सातत्याने होत आहे. दरम्यान, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नॅम्प प्रकल्पान्वये ठाणे शहरात नियमित हवेचे सर्वेक्षण करण्यात येत असून त्यामध्ये शहरात हवेतील धुलीकणांच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याची बाब पुढे आली आहे. त्याचबरोबर वाहतुकीची मोठी वर्दळ असलेल्या ठाण्यातील तीन हात नाका परिसरात यंत्राद्वारे हवेची गुणवत्ता तपासण्यात आली. वाढते शहरीकरण, गृहसंकुलांची उभारणी, बांधकाम साहित्यांची वाहतूक यामुळे शहरातील हवेत धुलीकणांच्या प्रमाणात वाढ होत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. हवेतील धुलीकण मानवी आरोग्यास बाधक ठरत असल्यामुळे अनेकांना विविध प्रकारच्या आजारांना समोरे जावे लागते. या पाश्र्वभूमीवर प्रशासनाने शहरात दोनशे प्रदूषण नियंत्रक बसविण्यात येतील.
प्रस्ताव काय?
ठाणे शहरात प्रदूषण नियंत्रकांची उभारणी करण्याचा प्रकल्प खासगी लोकसहभागातून (पीपीपी) हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रस्तावानुसार संबंधित संस्थेद्वारे शहरात प्रदूषण नियंत्रकांची उभारणी केली जाणार आहे. या यंत्रासाठी दोन बाय दोन फुटाची जागा लागणार असल्यामुळे ते शहरातील पदपथावरही बसविण्यात येणार आहेत. या यंत्राच्या खरेदीसाठी लागणारा निधी खासगी आस्थापनेद्वारे उभारण्यात येणार असून या संस्थांना यंत्रावर त्यांची जाहिरात करण्याचे अधिकार देण्यात येणार आहे. या यंत्राची देखभाल व दुरुस्ती संबंधित संस्थेद्वारे करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा कोणताही भांडवली व महसुली खर्चाचा भार पालिकेवर पडणार नाही, असा दावा प्रशासनाने केला आहे.
यंत्रांची कार्यपद्धती..
प्रदूषण नियंत्रक ही उपकरणे १४०० मी.मी. उंचीचे व ७०५ मी.मी. रुंदीचे असून या उपकरणामध्ये विशिष्ट पद्धतीने पंख्याची रचना करण्यात आली आहे. या उपकरणातील ०.५ एच.पी. क्षमतेच्या मोटारद्वारे वातावरणातील दोन हजार सीएफएम इतकी हवा शोषली जाते. धुलीकणांचे आकारमान १० ते १०० मायक्रॉन इतके असते. हवेतील २५ ते ५० मायक्रॉन आकारमानाचे धुलीकण उपकरणातील विशिष्ट फिल्टरद्वारे संकलित करण्यात येते आणि उर्वरित शुद्ध हवा उपकरणातून पुन्हा बाहेर सोडण्यात येते. या पद्धतीने हवेतील धुलीकणांची मात्रा ३० ते ४४ टक्केपर्यंत कमी होते.
