ठाणे – हवेतील धूळ आणि वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ठाणे महापालिकेने बांधकाम प्रकल्पांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील ८० बांधकामस्थळांची तपासणी केली असता तब्बल ६९ ठिकाणी नियमांचे उल्लंघन आढळले. संबंधित विकासकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, सात बांधकाम व्यावसायिकांकडून प्रत्येकी ५० हजार रुपयांप्रमाणे ३ लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गृह प्रकल्प तसेच रस्ते प्रकल्पांची कामे सुरू आहेत. पावसाळा संपल्यानंतर हिवाळ्यात जमिनीवरील धूलिकण हवेत मिसळून वायुप्रदूषणात मोठी वाढ होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने बांधकाम प्रकल्पांमधून होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आतापासूनच कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरातील सुरू असलेल्या बांधकामांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विकासकांवर कारवाई केली जात आहे.
२६ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने नऊ प्रभाग समित्यांच्या हद्दीतील ८० बांधकामस्थळांची तपासणी केली. यामध्ये ६९ ठिकाणी नियमांचे उल्लंघन आढळल्याने संबंधित विकासकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर सात विकासकांवर प्रत्येकी ५० हजार रुपयांप्रमाणे एकूण तीन लाख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या सुमारे ४१९ ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. बांधकाम करताना निर्माण होणारी धूळ, माती आणि मलब्यामुळे हवेच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होतो. बांधकाम प्रकल्पांमधून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी उच्च न्यायालयाने जनहित याचिकेच्या अनुषंगाने विविध निर्देश दिले आहेत. त्यानुसार २९ मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक बांधकामस्थळांवर या नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे महापालिकेच्या तपासणीतून समोर आले आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण विभागाने प्रत्यक्ष बांधकामस्थळांवर जाऊन पाहणी सुरू केली आहे.
२६ ते ३० ऑक्टोबरदरम्यान करण्यात आलेल्या तपासणीत ८० पैकी ६९ ठिकाणी नियमांचे पालन होत नसल्याचे आढळले. संबंधित विकासकांना नोटीस बजावून सात दिवसांच्या आत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सात विकासकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, यापुढेही बांधकामस्थळांची तपासणी सुरू राहणार असून, प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे पालन न करणाऱ्या विकासकांवर कारवाई केली जाणार आहे.
प्रदूषण नियंत्रणाचे नियम
वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने बांधकाम प्रकल्पांसह विविध प्रदूषण स्रोतांवर कठोर निर्बंध लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. ५० मीटरपेक्षा अधिक उंचीच्या बांधकामांना २५ फूट उंचीचे संरक्षक पत्रे लावणे, इमारतींना चारही बाजूंनी हिरव्या कापडाने झाकणे आणि सातत्याने पाण्याची फवारणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. बांधकामस्थळी प्रदूषण मोजणारी यंत्रणा बसवावी लागणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांना कामबंद नोटीस देण्यासह बांधकामस्थळ सील करण्याची कारवाई करणे. तसेच उघड्यावर कचरा जाळण्यास बंदी, वाहनांवर कारवाई आणि स्मशानभूमी, बेकरींमध्ये पर्यावरणपूरक इंधन वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ठाणे शहरात ८० बांधकामस्थळांची तपासणी केली. यामध्ये ६९ ठिकाणी नियमांचे उल्लंघन आढळल्याने संबंधित विकासकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर सात विकासकांवर प्रत्येकी ५० हजार रुपयांप्रमाणे एकूण तीन लाख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. नोटिसनंतरही उर्वरित विकासकांनी नियमांचे पालन केले नाहीतर त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या मुख्य प्रदूषण नियंत्रण अधिकारी विद्या सावंत यांनी दिली.
