खड्ड्यांत गेली नोकरी… पालकमंत्र्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी ठाण्यातील चार अभियंते निलंबित

रस्त्यावरील खड्डे आणि त्यातच अवेळी सुरू असलेली अवजड वाहतूक यामुळेच वाहतूककोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

Eknath Shinde
कालच पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यामधील रस्त्यांची पहाणी केली होती. (फोटो ट्विटरवरुन साभार आणि प्रतिनिधिक)

ठाण्यामध्ये मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका ते नितीन कंपनी, तसेच घोडबंदर भागातील मुंबई-अहमदाबाद महामार्गासह मुंब्रा बाह्यवळण मार्ग आणि कळवा-विटावा मार्गावर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाहूतकोंडी होत असून यासाठी रस्त्यांवरील खड्डे कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे. याच कारणामुळे आता रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे शहरातील नागरिकांचा झालेला कोंडामाऱ्याची दखल घेत महानगरपालिकेच्या चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे.

ठाण्यातील कार्यकारी अभियंता चेतन पाटील, प्रकाश खडतरे आणि कनिष्ठ अभियंता संदीप सावंत तसेच संदीप गायकवाड यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे. ठाणे शहरातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका ते नितीन कंपनी तसेच घोडबंदर भागातील मुंबई-अहमदाबाद महामार्गासह मुंब्रा बाह्यवळण मार्ग आणि कळवा-विटावा मार्गावर शुक्रवारी सकाळी वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यावरील खड्डे आणि त्यातच अवेळी सुरू असलेली अवजड वाहतूक यामुळेच ही कोंडी झाली होती. यामुळे दहा मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी दोन ते अडीच तासांचा अवधी लागत असल्याने नागरिक हैराण झाल्याचं पहायला मिळत होतं.

पालकमंत्र्यांचे निर्देश

शुक्रवारी दुपारच्या वेळेत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांसमवेत रस्त्यांचा पाहणी दौरा केला होता. या दौऱ्याआधी शिंदे यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली होती. पावसाळ्याआधी रस्त्यांची डागडुजी करूनही पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडतात, याचा अर्थ कामाची गुणवत्ता तपासली जात नाही. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील हे रस्ते असतील, त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करा, संबंधित ठेकेदारावर कारवाई करा, गरज पडल्यास काळ्या यादीत टाका तसेच याबाबत संपूर्ण चौकशी करून कठोर कारवाई करा, असे निर्देश शिंदे यांनी या वेळी दिले होते. सरकार रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पैसे देते, पण पहिल्याच पावसात पुन्हा खड्डे पडतात. त्यामुळे सरकारचे नाव खराब होते. प्रशासन आणि ठेकेदाराच्या कामचुकारपणामुळे लोकप्रतिनिधींना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागते. इथून पुढे हे प्रकार खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. घोडबंदर रस्त्यावरील आनंदनगर, तसेच गायमुख येथील खड्डे बुजवण्याच्या कामाची त्यांनी पाहणी केली. त्यावेळेस तिथे योग्य प्रकारे काम होत नसल्याचे निदर्शनास येताच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेतले आणि गुणवत्तेकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले होते.

विकेण्डही वाहतूककोंडीचा…

शुक्रवारीही खारेगाव टोलनाका ते नितीन कंपनीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे भिवंडी, नाशिक आणि नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांचे हाल झाले. माजीवडा येथील कोंडीचा परिणाम घोडबंदर मार्गावरील वाहतुकीवरही झाला. तसेच कळवा-विटावा या मार्गावरही वाहतूक कोंडी झाली होती. कळवा-विटावा मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे कळवा, विटावा भागातही वाहतूक कोंडी झाली होती.

खर्चाची श्वेतपत्रिका काढा

ठाणे महापालिका आणि एमएसआरडीसी अंतर्गत दरवर्षी खड्डे बुजवण्याकरिता कोट्यवधी रुपये खर्च होतात. पण खड्डे पुन्हा जैसे थे होतात आणि कोट्यवधी रुपये पाण्यात जातात. यास निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणारे ठेकेदार जबाबदार आहेत. याशिवाय टक्केवारीची टोळीही तेवढीच जबाबदार आहे. याबाबत जनतेसमोर खर्चाचा तपशील आला पाहिजे, यासाठी गेल्या पाच वर्षांत झालेल्या खर्चाची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे खड्ड्यांचा दौरा तातडीने करत आहेत, तेच गेली पाच वर्षे पालकमंत्री आहेत. ते एमएसआरडीसीचेही मंत्री आहेत. त्यांनी किती ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले? किती अधिकाऱ्यांवर कारवाई केली, हे जाहीर करावे. पुढील काळात खड्डे, वाहतूक कोंडी आणि अपघातांबाबत अशी गंभीर परिस्थिती होऊ नये, यासाठी कृती आराखडा ठरवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीची बैठक बोलवावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

पालकमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान सुरळीत वाहतूक

कालच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान म्हणजेच दुपारच्या वेळेत वाहतूक पोलिसांनी सर्व रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत केली. तर, या वेळेत अवजड वाहतूकही कमी प्रमाणात सुरू असल्याचे दिसून आले. यामुळे हे रस्ते दुपारनंतर काही काळ कोंडीमुक्त झाले होते. मात्र सायंकाळी पुन्हा कोंडी होण्यास सुरुवात झाली. याच खड्डेयुक्त रस्त्यांमुळे आता थेट कार्यकारी अभियंत्यासहीत एकूण चार जणांना सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे.

तात्पुरती डागडुजी…

या दौऱ्याआधी पालिकेकडून शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे डांबराच्या साहाय्याने बुजविण्याची कामे सुरू होती. तसेच या वेळेत अवजड वाहतूकही कमी प्रमाणात सुरू असल्याने वाहतूक सुरळीतपणे सुरू असल्याचे दिसून आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Thane potholes and traffic jam 4 civil engineers suspended scsg

फोटो गॅलरी