ठाणे : ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शहरांमधील रस्त्यांवर पावसात पडलेल्या असंख्य खड्ड्यांमुळे वाहतुकीचा फज्जा उडाला आहे. ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर व उल्हासनगरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. अनेक रस्त्यांवरील खड्ड्यांचा आकार वाढल्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. दुचाकीस्वारांना सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. विविध प्राधिकरणे व पालिकांनी खड्डे बुजवून वाहतूक सुरक्षित करण्याची मागणी केली जात आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील बहुसंख्य अंतर्गत रस्ते काही वर्षांपूर्वी काँक्रीटचे करण्यात आले आहेत. मात्र, नौपाडा, मीनाताई ठाकरे चौकातील उड्डाणपुलांसह काही प्रमुख मार्गांवरील रस्ते अद्यापही डांबरी आहेत. काँक्रीटचे रस्ते तुलनेने सुस्थितीत असले तरी यंदाच्या पावसाळ्यात शहरातील अनेक उड्डाणपुलांसह डांबरी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.

मुंबई-नाशिक महामार्ग व घोडबंदर मार्ग हे शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे मार्ग आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावरील आनंदनगर ते माजिवडा दरम्यानचा रस्ता व उड्डाणपूल डांबरी असून, या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्याने ते वाहनचालकांच्या नजरेस पडत नाहीत. त्यामुळे खड्ड्यांमध्ये वाहने आदळून अपघात होण्याचा धोका वाढला आहे.

घोडबंदर मार्गावरील मुख्य रस्ता व सेवा रस्ते जोडणी प्रकल्पात काँक्रीटचे करण्यात आले आहेत. मात्र, कापूरबावडी, मानपाडा, पातलीपाडा व वाघबीळ येथील पुलांवरील डांबरी रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या ठिकाणीही अपघातांचा धोका वाढला आहे. विविध प्राधिकरणांसह ठाणे महापालिकेकडून मास्टिकच्या साह्याने खड्डे बुजविले जात असले तरी काही दिवसांतच ही डागडुजी उखडून पुन्हा खड्डे पडत आहेत. कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरातही अनेक डांबरी रस्त्यांची अशीच अवस्था आहे.

भिवंडी शहरातील अनेक रस्त्यांवर यंदाच्या पावसाळ्यात मोठे खड्डे पडले आहेत. अंजूरफाटा ते कल्याणफाटा, कल्याण नाका चौक, काशीकर कम्पाऊंड, अमजेदिया रोड, बाबला कंपाऊंड, कामतघर-ताडाळी रोड, पारनाका बाजारपेठ, धामणकर रोड व जुना ठाणे रस्ता यांसह अनेक अंतर्गत मार्गांवर खड्डे पडल्याने वाहनचालक त्रस्त आहेत.

काही ठिकाणी काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात आले असले तरी त्यांच्या दोन्ही बाजूंच्या पट्ट्यांची कामे पूर्ण न झाल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. कल्याण-डोंबिवलीतही रस्त्यांची चाळण डोंबिवलीतील गणेशनगर रेल्वे मैदानाजवळील विष्णुनगर वाहतूक चौकी ते एकविरा पेट्रोल पंप रस्ता, कल्याण पूर्वेतील नेतिवली ते मलंगगड रस्ता, चिंचपाडा रस्ता, कल्याण पश्चिमेतील मोहने-आंबिवली रस्ता, काटई-बदलापूर रस्त्यावरील वसार गाव हद्दीतील रस्ता तसेच २७ गावांतील अंतर्गत पोहोच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. याशिवाय गांधारे पूल, कोपर पूल, डोंबिवलीतील दत्तनगर चौक, नांदिवली ते समर्थ मठ रस्ता, गांधीनगर ते भोपर रस्ता, टिटवाळा ते बल्याणी रस्ता तसेच वडवली आणि बनेली परिसरातील रस्त्यांचीही अवस्था खराब झाली आहे.

अंबरनाथ-बदलापूर, उल्हासनगरमध्येही खड्डे

अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील उड्डाणपूल सध्या खड्ड्यात गेले आहेत. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी वाढली आहे. उल्हासनगर शहरातील बहुतांश डांबरी रस्त्यांना खड्डे पडले आहेत. फॉलोवर लाइन चौक, शहराचे अंबरनाथकडील प्रवेशद्वार या भागात मोठ्या प्रमाणावर पडलेल्या खड्ड्यांमुळे कल्याण बदलापूर राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणावर कोंडी होत आहे. काटई ते अंबरनाथ मार्गावर डावळपाडा येथे सुमारे पाचशे मीटर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. कल्याण, मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागातील डांबरी रस्त्यांचीही हीच अवस्था आहे.