ठाणे : ठाणे शहरात रविवारी सकाळी नागरिकांवर वीज पुरवठा खंडीत होण्याचे संकट कोसळले होते. सुमारे साडे-पाच तासानंतर येथील विद्युत पुरवठा पूर्णत: सुरळीत करण्यात महावितरणला शक्य झाले. ऐन उकाड्यात विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

ठाणे शहरातील घोडबंदर, कोलशेत, बाळकूम, वसंत विहार भागात सकाळी विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. सकाळी ६ वाजेपासून अचानक वीज पुरवठा खंडीत झाल्याने अनेकांचे हाल झाले. याबाबत महावितरण कंपनीकडून स्पष्टीकरण आले आहे.

माहिती नुसार, २२०/१००/२२ केव्ही पातलीपाडा महापारेषण उपकेंद्राशी संबंधित २२० केव्ही पडघा–कांबा–खारबाव–कोळशेत ही वीजवाहिनी रविवारी सकाळी ६.०५ वाजता ट्रिप झाली होती. तसेच वाडा अति उच्चदाब उपकेंद्रातील २२० केव्हीच्या ब्रेकरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पडघा–वाडा–भावेघर–रोमा–कोळशेत या पर्यायी वीज वाहिनीवर भार घेणे शक्य झाले नाही. परिणामी पातलीपाडा उपकेंद्र पूर्णतः बंद पडले.

या बिघाडामुळे वसंत विहार, घोडबंदर रोड परिसरातील दोन्ही बाजूचा भाग तसेच मानपाडा, पातलीपाडा, वाघबीळ, ओवळा, गायमुख व चेना या परिसरातील सुमारे ६० ते ६५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता व नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. २२० केव्ही वीजवाहिनी पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले व तांत्रिक अडचणी दूर करून सकाळी ११.३० वाजेपर्यंत वीजपुरवठा पूर्णतः सुरळीत करण्यात आला आहे.

दरम्यान, महापरेषणने पर्यायी व्यवस्था करून १०० केव्हीवर भार बदल करून कोलशेतचा भाग पहिल्या टप्यात पूर्ववत केला व उपलब्ध वीजपुरवठ्याच्या आधारे आजूबाजूच्या भागांमध्ये चक्राकार भारनियमानाद्वारे वीजपुरवठा सुरू ठेवण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती.