ठाणे : सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी ठाणे शहरातील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा विस्कळीत झाला. घोडबंदर परिसरातील कसारवडवली आणि आनंदनगर येथे पहाटे ४ वाजता खंडित झालेला वीजपुरवठा तब्बल साडेपाच तासांनी पूर्ववत झाला, तर सावरकरनगरमध्ये सोमवार दुपारपासून गेलेली वीज तब्बल १५ तासांनंतर आली. त्यानंतरही मंगळवारी सकाळी पुन्हा वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शहराच्या अनेक भागात वीजेचा लपंडाव सुरू होता. ‘

सोमवारप्रमाणेच मंगळवारीही ठाणे शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाचा सर्वाधिक फटका घोडबंदर परिसरातील कसरवडवली, आनंदनगर तसेच सावरकरनगर, लोकमान्यनगर, वर्तकनगर आणि आसपासच्या भागांना बसला. अनेक ठिकाणी वीजपुरवठा तासन्तास बंद राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले. घोडबंदर परिसरात पहाटे सुमारे ४ वाजता वीजपुरवठा खंडित झाला. सकाळी साडेनऊच्या सुमारास, म्हणजेच तब्बल साडेपाच तासांनी वीजपुरवठा पूर्ववत झाला.

या काळात संपूर्ण परिसर अंधारात होता. वीज नसल्याने अनेक गृहनिर्माण संकुलांमध्ये लिफ्ट जनरेटरवर सुरू ठेवण्यात आल्या. मात्र काही ठिकाणी जनरेटरचे इंधन संपल्याने लिफ्टही बंद पडल्या होत्या. आधीच कमी दाबाने पाणीपुरवठा होत असताना वीजपुरवठा खंडित झाल्याने विद्युत पंप बंद पडले आणि अनेक संकुलांमध्ये पाणीपुरवठाही ठप्प झाला. घरातून काम करणारे कर्मचारी, ऑनलाइन वर्गांना उपस्थित राहणारे विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

मोबाईल चार्जिंगपासून इंटरनेट सेवा आणि दैनंदिन कामांपर्यंत सर्वच व्यवहारांवर परिणाम झाला. येथील विद्युत उप केंद्रात बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडीत झाल्याचे महावितरण प्रशासनाकडून सांगण्यात आले. ठाणे येथील सावरकरनगरमध्ये परिस्थिती अधिक गंभीर होती. सोमवार दुपारी १२ वाजता खंडित झालेला वीजपुरवठा तब्बल १५ तासांनंतर, मंगळवारी पहाटे ३ वाजता सुरू झाला. मात्र त्यानंतर अवघ्या काही तासांतच सकाळी ९ वाजल्यापासून पुन्हा वीजपुरवठा खंडित झाल्याने सावरकरनगर, लोकमान्यनगर, वर्तकनगरसह परिसरातील नागरिक संतप्त झाले.

महावितरणकडून याबाबत कोणताही स्पष्ट खुलासा करण्यात आला नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. या भागासाठी असलेल्या विद्युत उपकेंद्रात बिघाड झाल्याने येथील वीज पुरवठा खंडीत झाला होता, अशी माहीती महावितरण प्रशासनाने दिली. शहरातील इतर अनेक भागांतही दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वीज यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने वीजपुरवठा विस्कळीत झाला होता तर, काही ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता, अशी माहिती महावितरण प्रशासनाकडून देण्यात आली.