ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शुक्रवारी घोडबंदर परिसरात मेणबत्ती मार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये पूर्णेकर कुटुंबीयांसह आगरी-कोळी समाजातील हजारो नागरिक सहभागी झाले होते. गुरुवारीही पूर्णेकर यांच्या निवासस्थानाजवळून मेणबत्ती मार्च काढण्यात आला होता.
सागरी भूमिपुत्र महासंघ आणि भूमिपुत्र एकीकरण समिती यांच्या वतीने या मार्चचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, मंडळांचे सदस्य, तरुण आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पूर्णेकर कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकशाही मार्गाने आवाज उठवणे, हत्याप्रकरणातील सत्य समोर आणण्यासाठी पाठपुरावा करणे आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी करणे, हा मार्चमागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
घोडबंदर येथील कासारवडवली परिसरातील पिपल बावडी येथून या मार्चला सुरुवात झाली. कासारवडवली नाका येथील विजय पार्क परिसरात मार्चची सांगता झाली. यावेळी निषेधाचे प्रतीक म्हणून अनेकांनी काळे कपडे, तर आगरी-कोळी समाजाच्या अस्मितेचे प्रतीक असलेली लाल टोपी परिधान केली होती.
