ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी आज, मंगळवारी जांभळीनाका येथील आनंद दिघे घड्याळ टॉवर ते खारटन रोड येथील आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळ स्मारकापर्यंत मेणबत्ती मार्च काढण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजल्यानंतर हा मार्च निघणार असून, त्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक कोंडी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शिवसेना (ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची २९ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास मानपाडा येथील त्यांच्या कार्यालयात निर्घृण हत्या करण्यात आली होती. पाच जणांनी कार्यालयात घुसून दोन बंदुकांमधून गोळीबार केला होता. तसेच, चॉपरनेही वार करण्यात आले होते. या प्रकरणात पूर्णेकर कुटुंबीयांनी शिंदे गटाच्या विद्यमान नगरसेविका आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे तसेच त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, या हत्याकांडाच्या निषेधार्थ आणि आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात रस्ता रोको, मेणबत्ती मार्च, पोलीस ठाण्यांबाहेर ठिय्या अशा विविध प्रकारची आंदोलने सुरू आहेत.

याच आंदोलनांचा भाग म्हणून मंगळवारी सायंकाळी ६ वाजल्यानंतर जांभळीनाका येथील दिवंगत आनंद दिघे टॉवरपासून मेणबत्ती मार्चला सुरुवात होणार आहे. हा मार्च खारटन रोड येथील दिवंगत आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळ स्मारकापर्यंत काढण्यात येणार आहे. ठाणे शहरातील विविध भागांतून नागरिक या आंदोलनासाठी एकत्र येणार असल्याने मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असून, दररोज हजारो वाहनचालक या मार्गावरून ये-जा करतात. मार्चच्या पार्श्वभूमीवर या परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. त्यामुळे सायंकाळच्या वेळेत या भागातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.