शिवसेना विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाणे शहरात मनसे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष, काँग्रेस,आम आदमी पक्ष, धर्मराज्य पक्ष, आरपीआय यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन ठाण्यात करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याकांडानंतर झालेल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाविषयी सर्वपक्षीय नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तसेच ९ ऑक्टोबर या दिवशी मोठ्या संख्येने पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्याचा इशारा नेत्यांनी दिला.

आमदार जितेंद्र आव्हाड, माजी खासदार राजन विचारे, मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यासह विविध पक्षाचे नेते यावेळी उपस्थित होते. मोर्चानंतरही कायदा सुव्यवस्था सुरू झाली नाही तर योग्य माणसाच्या घरावर मोर्चा काढला जाईल असा इशारा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिला. तर प्रदीप पूर्णेकर यांची हत्या झाल्यानंतरही पालकमंत्री त्यांच्या कुटुंबीयांकडे भेट देण्यासाठी देखील गेले नाही. पालकमंत्री झोपले आहेत का? असा प्रश्न राजन विचारे यांनी उपस्थित केला