ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप (बाळू) पूर्णेकर यांची निर्घृण झालेल्या हत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांसह सर्व संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी भूमिपुत्र समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पूर्णेकर कुटुंबीयांनी योग्य पुरावे सादर करूनही या प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधाराला वाचवले जात असल्याची भावना समाजामध्ये निर्माण झाली असून, या प्रकरणातील तपास आणि कारवाईबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर न्यायाच्या मागणीसाठी समाजाला एकत्र आणण्याच्या उद्देशाने उद्या, ३० ऑक्टोबरला घोडबंदर येथील कासारवडवली गावात कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले आहे.
सागरी भूमिपुत्र महासंघ आणि भूमिपुत्र एकीकरण समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या कॅन्डल मार्चमध्ये विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, मंडळांचे सदस्य, तरुण आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकशाही मार्गाने आवाज उठवणे, या प्रकरणातील सत्य समोर यावे यासाठी पाठपुरावा करणे आणि दोषींवर कायद्यानुसार कारवाईची मागणी करणे, ही या आंदोलनामागील प्रमुख भूमिका असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
भूमिपुत्र समाजात वाढता रोष; न्यायासाठी एकजुटीचे आवाहन – एखाद्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतर त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी समाजाने त्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. पूर्णेकर कुटुंबीयांकडून पुरावे सादर करण्यात आल्याचे सांगितले जात असताना, या प्रकरणात न्याय मिळण्यास विलंब होत असल्याची भावना भूमिपुत्र समाजातील नागरिकांमध्ये अस्वस्थता आणि रोष निर्माण करत आहे. या प्रकरणातील सर्व पुराव्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी, कोणालाही राजकीय अथवा अन्य प्रभावामुळे संरक्षण मिळू नये आणि दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी समाजातून पुढे येत आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याऐवजी शांततामय आणि लोकशाही मार्गाने न्यायाची मागणी अधिक व्यापक करण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. पूर्णेकर कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात येत आहे.
ठाणे शहरातील गावोगावी आंदोलनाचा निर्धार – कासारवडवली येथे होणारा हा कॅन्डल मार्च ठाणे शहरातील गावांमध्ये विभागनिहाय आयोजित करण्यात येणाऱ्या न्यायाच्या आंदोलनांची सुरुवात ठरणार आहे. येत्या काही दिवसांत ठाणे शहरातील विविध गावांमध्ये अशाच प्रकारचे कॅन्डल मार्च आणि निषेध मोर्चे आयोजित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. एका गावापुरता मर्यादित न राहता, न्यायाच्या मागणीसाठी संपूर्ण भूमिपुत्र समाजाने एकजुटीने उभे राहावे, हा या आंदोलनामागील व्यापक उद्देश असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात येत आहे. आगामी काळात गावोगावी नागरिकांना एकत्र करून या प्रकरणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधणे, निष्पक्ष तपासाची मागणी करणे आणि पूर्णेकर कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन अधिक व्यापक करणे, अशी भूमिका आयोजकांनी घेतली आहे.
काळे कपडे आणि लाल टोपी परिधान करून सहभागी होण्याचे आवाहन
उद्या सायंकाळी ६ वाजता पिपल बावाडी, कासारवडवली गाव येथून कॅन्डल मार्चला सुरुवात होणार असून, विजय पार्क, कासारवडवली नाका येथे त्याची सांगता होणार आहे. या वेळी निषेधाचे प्रतीक म्हणून काळे कपडे आणि आगरी-कोळी समाजाच्या अस्मितेचे प्रतीक असलेली लाल टोपी परिधान करून सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी, पीडित कुटुंबीयांना आधार देण्यासाठी आणि न्यायाच्या मागणीसाठी एकजूट दाखवण्यासाठी सर्व सामाजिक संघटना, मंडळे, तरुण आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सागरी भूमिपुत्र महासंघ आणि भूमिपुत्र एकीकरण समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.
