ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या कार्यालयात येऊन पाच जणांनी गोळीबार तसेच, धारदार शस्त्राने वार करुन त्यांची हत्या केली. या हत्याकांडानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, मनसे, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर आता सुषमा अंधारे या पूर्णेकर यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत.

प्रदीप पूर्णेकर हे अंत्यत धाडसी होते. अनेक सामाजिक विषयावर त्यांनी आवाज उठविला होता. त्यामुळे त्यांच्यासोबत मोठ्याप्रमाणात नागरिक होते. असे असतानाही त्यांच्या कार्यालयात शिरुन त्यांची हत्या झाली. या हत्याकांडानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पक्षाचे नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

तर, शुक्रवारी वनमंत्री गणेश नाईक, भाजप आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांनीही त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. शनिवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या देखील पूर्णेकर कुटुंबियांना सांत्वन देण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे अंधारे या नेमक्या काय बोलणार याकडे माध्यमांचे लक्ष लागले आहेत.

आतापर्यंत तीन अटकेत

– घोडबंदर येथील माजिवडा, मनोरमानगर भागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख यांच्या हत्येप्रकरणाच्या तपासासाठी नेमलेल्या विशेष तपास पथकाने याप्रकरणातील आणखी दोन आरोपींना शुक्रवारी अटक केली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा अभयारण्या परिसरातून या दोघांना ताब्यात अटक करण्यात आली असून याप्रकणात अटकेत असलेल्या आरोपींची संख्या तीन इतकी झाली आहे. या दोघांची हत्येतील नेमकी भूमिका आणि आणखी कोणाचा सहभाग आहे का, या दिशेने पोलिस तपास करीत आहेत.