ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ घोडबंदर परिसरात झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांना कापूरबावडी पोलीस ठाण्यात पोलिसांकडून अमानुष मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप पूर्णेकर कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी तरुणांना अमानुष मारहाण (थर्ड डिग्री) केली असून, त्यांच्या पार्श्वभागात बोट घालण्यास सांगितल्याचा धक्कादायक आरोपही मारहाण झालेल्या तरुणांनी केला. या प्रकाराची माहिती मिळताच प्रदीप पूर्णेकर यांचे बंधू तथा माजी नगरसेवक जयनाथ पूर्णेकर आणि मुलगा राम पूर्णेकर यांनी शुक्रवारी कापूरबावडी पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांवर संताप व्यक्त केला. त्यामुळे पोलीस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची गुन्हे अन्वेषण शाखेकडून चौकशी सुरू असतानाच, त्यांच्या मुलाने म्हणजेच राम पूर्णेकर यांनी मंगळवारी दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आंदोलनापूर्वीच पोलिसांनी राम पूर्णेकर यांना रिक्षात बसवून पोलीस ठाण्यात आणले. या कारवाईमुळे संतप्त झालेल्या पूर्णेकर समर्थकांनी नौपाडा पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करत पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना अटक करा, अन्यथा आम्हा सर्वांना अटक करा,’ अशी मागणी करत समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
त्यानंतर नौपाडा-हरिनिवास मार्गावर दुपारी १.३० वाजल्यापासून रात्री आठनंतरही रास्तारोको सुरू होता. यामुळे परिसरातील वाहतुकीचा खोळंबा झाला. याचदरम्यान काही आंदोलक मानपाडा, कोलशेत आणि बाळकूम परिसरात पोहोचले. तेथेही त्यांनी रास्तारोको केल्याने घोडबंदर परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली. बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास पोलिसांवर दगडफेक झाल्याची घटनाही घडली. या प्रकरणी पोलिसांनी २५० हून अधिक जणांविरोधात गुन्हे दाखल केले होते.
राम पूर्णेकर यांचे आरोप – गुरुवारी आमदार आदित्य ठाकरे यांनी पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर मानपाडा परिसरातील काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शुक्रवारी दुपारी राम पूर्णेकर व जयनाथ पूर्णेकर यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात जाऊन या तरुणांना झालेल्या मारहाणीबाबत जाब विचारला.
हत्या प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार राजेंद्र शिंदे व मीनाक्षी शिंदे यांच्यावर अटकेची कारवाई करण्याऐवजी आंदोलनात सहभागी झालेल्या समर्थकांना ताब्यात घेऊन अमानुष मारहाण केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.पोलिसांनी तरुणांशी अनैसर्गिक कृत्य करण्यास सांगितल्याचा आरोपही राम पूर्णेकर यांनी केला.
संबंधित तरुणांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले असून, आणखी काही तरुणांनाही अशाच प्रकारे मारहाण झाल्याचे त्यांनी सांगितले. या आरोपांमुळे प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील तपासासोबतच आंदोलकांवरील पोलिसांच्या कारवाईचाही मुद्दा चर्चेच आला आहे.
