ठाणे : प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर सर्वस्व गमावल्याची भावना निर्माण झाल्याने त्यांच्या पत्नी विजेता पूर्णेकर यांचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश मानपाड्यातील घरच्या वातावरणात भरून गेला. पप्या शिंदे व प्रदीप पूर्णेकर हे एका ताटात जेवत होते, असे सांगत त्याला हे निर्घृण कृत्य करण्यास कोणी भाग पाडले, असा सवाल उपस्थित केला. पतीच्या हत्येची माहिती मिळाल्यानंतर विजेता यांनी संतप्त भावना व्यक्त करीत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.
माझ्या नवऱ्याला का मारले पप्या शिंदे तू. तुझ्या मुलाच्या बारशाला मी नवे कपडे घेतले होते. कोणाच्या सांगण्यावरून तू हे केले, असा टाहो त्यांनी फोडला. त्यांच्यावर एवढे वार, गोळ्या का झाडल्या, तो कोणी मंत्री होता का, असा सवाल करीत स्वत:च्या भावनांना वाट मोकळी करून दिली. पूर्णेकर हे परिसरातील तरुणांमध्ये वाढत असलेल्या नशेच्या प्रवृत्तीविरोधात लढत होते, असा दावा विजेता यांनी केला. नशेमुळे तरुण-तरुणी वाया जात होते. त्यांच्यासाठी तो लढत होता.
आम्ही त्याला लढू नको म्हणून सांगत होतो, पण कोणाचेच ऐकले नाही, असे त्या म्हणाल्या. की लेकरं मागे टाकून तो आता गेला. आता मी सगळ्यांना एवढेच सांगेन की लोकांसाठी आता काही करायचे नाही. स्वत:साठी करा. मला आता राजकारण नको. राजकारणाची मी खूप मोठी किंमत चुकवलीय, अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली.
