बदलापूर : पूर्व मोसमी पावसाने लवकरच हजेरी लावल्याने मे महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात जून महिन्याचा पहिला आठवडा असल्याचे भासते आहे. मात्र यामुळे विजवितरण व्यवस्थेचे तीनतेरा वाजू लागले आहेत. गेल्या तास दिवसांपासून सातत्याने विजेचा लपंडाव होत असल्याने बदलापुरकर संतापले आहेत. देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी वीज पुरवठा खंडीत केला जात असल्याची बाब महावितरणकडून सांगितली जात असली तरी मध्यरात्री कसी दुरूस्ती असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. विजेच्या लपंडावामुळे झोपेचे खोबर होत असून पाणी पुरवठ्यावरही परिणाम होतो आहेे. अंबरनाथ शहरातही देखभाल दुरूस्तीच्या नावाखाली वीज पुरवठा खंडीत केला जातो आहे.

यंदा मोसमी पाऊस दोन आठवडे आधीच अंदमानात दाखल झाला. त्यामुळे पूर्वमोसमी पाऊसही लवकरच आला. परिणामी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे त्या आधी पश्चिम विक्षोभामुळे राज्यात पाऊस कोसळला होता. या सर्व परिस्थितीत राज्याच्या विविध भागाला सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसांच्या सरींचा सामना करावा लागला. पहिल्या पावसात वीज वितरण यंत्रणा कोलमडून पडते हा इतिहास आहे. यंदाही तसाच फटका वीज वितरण यंत्रणेला बसला.

पहिल्या अवकाळी पावसात बदलापूर, अंबरनाथ आणि आसपासच्या भागाला मोठा फटका बसला. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून होणारे किरकोळ बिघाड, दुरूस्ती, देखभालीची कामे आणि पावसापूर्वीची तयारी या सर्व कारणांमुळे वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. बदलापूर पूर्व, पश्चिम भागात नागरिकांकडून तक्रारी केल्या जात आहेत. कुठे काही मिनिटांसाठी तर कुठे तासनतास वीज पुरवठा खंडीत होत असल्याचे दिसून आले आहे. परिणामी पाणी पुरवठ्यावरही परिणाम होऊ लागला आहे. पहाटे लवकरच वीज पुरवठा खंडीत झाल्यास त्याचा पाणी पुरवठ्यावर परिणाम होतो. भूमीगत टाक्यांमध्ये पाणी असले तरी ते पाणी इमारतीवरील टाक्यांपर्यंत पोहोचवता येत नाही. त्यामुळे पाणी वितरण करता येत नसल्याने नागरिकांना पाण्यावाचून काढावे लागतात.

झोपेचे खोबरे आणि नोकरदारांचे हाल

रात्री विजेचा लपंडाव सुरू असल्याचे गेल्या तीन ते चार दिवसात दिसून आले आहे. त्यामुळे नोकरदार वर्गाच्या झोपेचे खोबरे होते आहे. पहाटे लवकर उठून लोकल पकडायची असल्याने नोकरदारांची झोपमोड झाली आहे. त्यामुळे नोकरदार वर्गात संतापाचे वातावरण आहे. तर दिवसाही सुट्ट्यांमध्ये अनेक घरात पाहुणे असल्याने दिवसा वीज गेल्यास घामांच्या धारात काढावे लागते.

समाज माध्यमांवर टीका

गेल्या काही दिवसांपासून विजेच्या लपंडावाचे पडसाद समाज माध्यमांवरही पाहायला मिळत आहेत. बदलापुरकर मोठ्या संख्येने समाजमाध्यमावर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. अनेक जण तर बदलापुरात घर घेऊ नका, अशाही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देखभालची वेळापत्रक बिघडले

महावितरणाकडून वाढलेल्या, वीजेच्या खांबांशेजारी, तारांजवळ आलेल्या झाडांच्या फांद्या कापणे तसेच इतर अनेक देखभाल दुरूस्तीची कामे मे महिन्याच्या अखेरीस केले जाते. मात्र यंदा लवकर आलेल्या अवकाळी पावसामुळे महावितरणाचे वेळापत्रक बिघडल्याचे वेळ कबूल केले आहे. मात्र तरीही नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून मोठ्या भागाची वीज खंडीत करण्याऐवजी लहान भागात दुरूस्तीची कामे केली जात असल्याचे महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यासाठी ठराविक भागातीलच वीजपुरवठा खंडीत केला जातो, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितेल आहे.