ठाणे : अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात लागलेल्या आगीत तीन बालकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील खासगी रुग्णालयांतील अग्निसुरक्षेची तपासणी करण्यात येणार आहे. आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत का, तसेच अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत आहेत का, याची पाहणी करण्याच्या सूचना ठाणे महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी अग्निशमन विभागाला दिल्या आहेत.
अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागून तीन बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राज्य सरकारने सर्व शासकीय, खासगी व धर्मादाय रुग्णालयांमधील अग्निसुरक्षा व विद्युत व्यवस्थेचे परीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णालयांमध्ये तांत्रिक कारणांमुळे आग लागण्याचा धोका असतो. वातानुकूलित यंत्रणा तसेच अन्य विद्युत उपकरणांमुळेही विद्युत यंत्रणेवर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी अग्निशमन दलाच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांना खासगी रुग्णालयांतील अग्निसुरक्षेची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या तपासणीदरम्यान अग्निसुरक्षा परीक्षण, आग लागल्याचा इशारा देणारी यंत्रणा, धूर शोधक यंत्रणा, अग्निशामक यंत्रे, अग्निशमन हायड्रंट व अग्निशमन लिफ्ट यांसह संपूर्ण अग्निसुरक्षा व्यवस्था कार्यरत आहे का, याची पाहणी केली जाणार आहे. तसेच या यंत्रणांची नियमित देखभाल व दुरुस्ती केली जाते का, याचीही खातरजमा करण्यात येणार आहे.
रुग्णालयातील शस्त्रक्रियागृह, विशेष नवजात शिशू अतिदक्षता कक्ष, अतिदक्षता विभाग व रक्तशुद्धीकरण केंद्रात मोठ्या प्रमाणावर विद्युत उपकरणांचा वापर केला जातो. त्यामुळे या विभागांमधील संभाव्य धोका लक्षात घेऊन सर्व विद्युत कामांचे तसेच विद्युत ऊर्जा वापराचे परीक्षण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण रुग्णालयातील प्राणवायूच्या टाक्या तसेच पाईपद्वारे प्राणवायू पुरवठा केला जाणाऱ्या भागांमध्ये धूम्रपानास सक्त मनाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच संबंधित क्षेत्र योग्य चिन्हांद्वारे स्पष्टपणे दर्शविणे आणि प्राणवायूशी संबंधित जोखमींबाबत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य अग्निसुरक्षा नियमांनुसार रुग्णालयांनी अग्निसुरक्षा ना-हरकत प्रमाणपत्र घेतले आहे का, याचीही तपासणी केली जाणार आहे. तपासणीदरम्यान आढळून येणाऱ्या त्रुटींबाबत आवश्यक कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना अग्निशमन विभागाला देण्यात आल्या आहेत.
