ठाणे : ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या मालमत्तांचे हक्क अधिक सुरक्षित करण्यासाठी भूमिअभिलेख विभागाने ड्रोन सर्वेक्षण आणि मोजणीची प्रक्रिया पूर्ण करावी, तसेच पात्र नागरिकांच्या याद्या तयार ठेवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरूवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून ठाणे जिल्ह्यातील ७६ हजार कुटुंबांना विविध योजनांचा लाभ देण्यासह जिल्ह्यातील २६८ कर्मचाऱ्यांना रखडलेला अनुकंपा नोकरीचा प्रश्न मार्गी लावण्यात आला. याशिवाय, कल्याण-आसनगाव चौथा रेल्वे मार्ग, दहिसर-भाईंदर किनारी मार्ग, ठाणे रिंग मेट्रो, आरटीओ, वैद्यकीय महाविद्यालय आणि कृषी बाजारपेठेसह विविध प्रकल्पांसाठी महसूल विभागाने जमीन उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात आले.
वाढदिवसानिमित्त सत्कार, हार-तुरे स्वीकारण्याऐवजी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सेवा अभियान राबविण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. यानुसार हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातून राज्यातील सुमारे दहा लाख कुटुंबांना विविध योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात आला. ठाणे जिल्ह्यात ७६ हजार कुटुंबांना लाभ मिळवून देण्यात आले, अशी माहिती देत या कामासाठी जिल्हाधिकारी आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचे बावनकुळे यांनी कौतुक केले.
राज्यात येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत जमीन हक्क कायदा आणून ठाण्यासह संपुर्ण राज्यातील इमारतींमधील प्रत्येक सदनिकाधारकाला मालमत्ता पत्रिका देण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची घोषणा महसूलमंत्री बावनकुळे यांनी केली. या निर्णयानंतर ठाणे जिल्ह्यातील फ्लॅटधारकांना मालमत्ता पत्रिका देण्याच्या पार्श्वभूमीवर भूमिअभिलेख विभागाने ड्रोन सर्वेक्षण आणि मोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आणि पात्र नागरिकांच्या याद्या तयार ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्याची माहीती बावनकुळे यांनी दिली. नागरिकांच्या मालमत्तेचे हक्क अधिक सुरक्षित करण्यासाठी ही कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांसाठी महसूल विभागाने शासकीय जमीन उपलब्ध करून दिल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली. कल्याण-आसनगाव चौथा रेल्वे मार्ग, दहिसर-भाईंदर किनारी मार्ग, ठाणे रिंग मेट्रो, ठाणे आरटीओ, अंबरनाथ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि भिवंडी जवळील बापगाव येथील कृषी बाजारपेठेसाठी जमीन देण्यात आली आहे. कांदळवन निर्मितीसाठी १३.७३ हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्यात आली असून, ठाण्यात कृषी विद्यापीठ आणि अधिवेशन केंद्रासाठीही जमीन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
शहापूरमधील केंद्रीय विद्यालयासाठी, बीएसएनएलच्या मनोऱ्यांसाठी तसेच मीरा-भाईंदर आणि अन्य प्रकल्पांसाठीही शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील २६८ कर्मचाऱ्यांचा रखडलेला अनुकंपा नोकरीचा प्रश्न मार्गी लावण्यात आल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. मीरा-भाईंदरमधील ३१८ एकर जमिनीला वर्ग दोनचा दर्जा देऊन ती सुरक्षित करण्याची कार्यवाही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
