ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर परिक्षेत्रात सूर्यास्तानंतर प्रवेशबंदी असतानाही शनिवारी रात्री येथे हजारोच्या संख्येने ढाबे, हाॅटेलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पाहण्यासाठी तरुण-तरुणी जमले होते. मद्य प्राशन करून तरुण-तरुणी येथे गोंधळ घालत होते. त्यामुळे येथील ग्रामस्थ हैराण झाले होते. काहीजण मद्याच्या बाटल्या घेऊन सार्वजनिक रस्त्यावर फिरत होते. या सर्व प्रकारानंतर संतापलेल्या आदिवासी आणि पर्यावरणवाद्यांनी येऊरच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर परिक्षेत्रात बेकायदा हाॅटेल, ढाबे उभारण्यात आले आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असूनही रात्री ११ नंतर अनेक हाॅटेल या भागात बेकायदेशीरपणे सुरू असतात. या हाॅटेलमध्ये मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपक वाजविले जातात. तसेच हाॅटेलमध्ये रात्रभर प्रखर उजेड असतो. त्यामुळे निशाचर प्राणी, पक्षी गायब झाल्याचा दावा येथील आदिवासींकडून केला जातो. तसेच येथील रहिवाशांनाही बाहेरून पर्यटकांच्या वाहनांचा त्रास सहन करावा लागतो. वर्षभरापूर्वी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याप्रकरणावरून वन विभाग, पोलीस आणि ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत सूर्यास्तानंतर येऊर वन परिक्षेत्रात प्रवेशबंदीचे आदेश दिले होते. असे असतानाही येथे प्रवेश सुरुच असल्याचे स्पष्ट झाले आहे. हेही वाचा - कल्याणमध्ये नांदिवलीतून अल्पवयीन गुराख्याचे अपहरण हेही वाचा - कल्याणमधील अटाळीत अल्पवयीन कार चालकाची मोटीराला धडक शनिवारी रात्री भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामधील क्रिकेट सामना पाहण्यासाठी येऊरच्या ढाब्यांवर मोठी गर्दी झाली होती. येथील अनेक ढाबे आदिवासी पाड्यांलगत आहे. रात्री क्रिकेटचा सामना पाहत असताना, येथे मोठा गोंधळ केला जात होता. रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या गोंधळामुळे येथील रहिवासी हैराण झाले होते. पाड्यातील एका महिलेला वैद्यकीय उपचारासाठी रात्री नेले जात होते. परंतु वाहतूक कोंडीमुळे महिलेला रुग्णालयात नेत असताना नागरिकांचे हाल झाले. पोलिसांकडे तक्रार करूनही रात्री त्यांच्याकडून नागरिकांना मदत मिळाली नसल्याचा दावा पर्यावरणवाद्यांनी केला. या प्रकारानंतर संतापलेल्या काही रहिवासी आणि पर्यावरणवाद्यांनी रविवारी सायंकाळी येऊरच्या उपवन येथील प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केले. तसेच अनधिकृत ढाबे पाडा अशी मागणी केली.