ठाणे : जिल्ह्यातील अनेक सार्वजनिक ग्रंथालये आजही मर्यादित निधीमुळे मूलभूत सुविधांच्या अभावाचा सामना करत आहेत. काही ठिकाणी इमारतींची दुरवस्था, जुने फर्निचर, अपुऱ्या वाचन सुविधा, तर अनेक ग्रंथालयांमध्ये आधुनिकीकरण रखडल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्राच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी विविध योजनांअंतर्गत लाखो रुपयांचे अर्थसाहाय्य जाहीर केले असून, या योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील पात्र ग्रंथालयांकडून २१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
ठाणे जिल्ह्यात शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत अनेक जुनी सार्वजनिक ग्रंथालये कार्यरत आहेत. मात्र, वाढत्या वाचकसंख्येच्या तुलनेत अनेक ठिकाणी पायाभूत सुविधा अपुऱ्या पडत आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, संशोधक, ज्येष्ठ नागरिक तसेच नियमित वाचक यांच्यासाठी अधिक दर्जेदार सुविधा उभारण्याची गरज सातत्याने व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध होणारे अनुदान ग्रंथालयांच्या विकासाला गती देणारे ठरणार असल्याचे मानले जात आहे.
या अनुदानामुळे जिल्ह्यातील अनेक ग्रंथालयांना नवीन इमारती उभारणे, जुन्या इमारतींची दुरुस्ती, वाचन कक्षांचे आधुनिकीकरण, आकर्षक ज्ञानकोपरे आणि बालविभाग विकसित करणे शक्य होणार आहे. परिणामी विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्य वाचकांसाठी अधिक दर्जेदार वाचन सुविधा निर्माण होऊन जिल्ह्यातील वाचन संस्कृतीला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा आहे.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करावेत. प्रस्तावाची ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक असून, मागील तीन वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल, जीएसटी नोंदणी, दरपत्रके, मालकी हक्काची कागदपत्रे, नकाशा आणि अंदाजपत्रक जोडणे आवश्यक आहे. अपूर्ण किंवा मुदतीनंतर प्राप्त प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही. जिल्हा ग्रंथालय विभागाने जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र सार्वजनिक ग्रंथालयांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले असून, प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत २१ ऑगस्ट २०२६ निश्चित करण्यात आली आहे.
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या ”समान निधी” आणि ”असमान निधी” योजनांअंतर्गत ग्रंथालय इमारतीचे बांधकाम व विस्तार, फर्निचर खरेदी, आधुनिकीकरण, ज्ञान कोपरा, बालकोपरा तसेच महोत्सवी वर्षानिमित्त विशेष अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. इमारत बांधकाम व विस्तारासाठी कमाल २५ लाख रुपये, फर्निचरसाठी ४ लाख रुपये, ज्ञान कोपऱ्यासाठी २.५० लाख रुपये, आधुनिकीकरणासाठी २ लाख रुपये, बालकोपऱ्यासाठी कमाल ६.८० लाख रुपये, तर इमारत बांधकामासाठी स्वतंत्र १० ते १५ लाख रुपयांपर्यंतचे अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. याशिवाय राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र, कार्यशाळा आणि प्रशिक्षण कार्यक्रमांसाठीही आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली आहे.
