डोंबिवली – डोंबिवल पश्चिमेतील माणकोली उड्डाणपुलाशी संलग्न असलेल्या दिवा-वसई रेल्वे मार्गावरील रेतीबंदर मोठागाव रेल्वे फाटकावरील चार पदरी रेल्वे उड्डाण पूल बांधण्यास रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली आहे. या पुलामुळे रेल्वे फाटकातील रस्ते मार्गाने होणाऱ्या प्रवाशांच्या खोळंब्याला पूर्णविराम मिळणार आहे. या पुलाच्या कामासाठी एकूण १६८ कोटीचा निधी प्रस्तावित असून या कामासाठीचा शासन निधीला प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी कल्याण डोंबिवली पालिकेने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
डोंबिवली शहर परिसरातून ठाणे, मुंबईचे अंतर कमी करणारा, कल्याण शिळफाटा, दुर्गाडी, कोन ते भिवंडी बाह्यवळण रस्त्यावरील कोंडीतून मुक्तता करण्यासाठी बहुतांशी प्रवासी डोंबिवलीतून माणकोली उड्डाण पूलमार्गे ठाणे, मुंबई, मुंब्रामार्गे नवी मुंबई, पनवेलकडे जाण्यास प्राधान्य देत आहेत. माणकोली उड्डाण पुलावर जाण्यासाठी डोंबिवली शहरातून रेतीबंदर मोठागाव रेल्वे फाटकातून जावे लागते. हा रेल्वे मार्ग दिवा-वसई, वसई-पनवेल शहरांना जोडला आहे.
माणकोली उड्डाण पुलावरील वाहन भार वाढला आहे. ही सर्व वाहने मोठागाव येथे आल्यावर त्यांना एक्सप्रेस, मेल, मालगाड्या जाईपर्यंत रेल्वे फाटकात दुतर्फा अडकून पडतात. या रेल्वे फाटकावरील उड्डाण पुलाची उपयुक्तता विचारात घेऊन कल्याण डोंबिवली पालिकेने शासनाकडे दोन वर्षापूर्वी निधीची मागणी केली होती. शासनाने १६८ कोटीचा निधी मंजूर केला आहे. या निधीला प्रशासकीय मान्यता द्यावी अशी मागणी पालिकेने ठाणे जिल्हाधिकारी डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे केली आहे.
रेल्वे फाटकावर चार पदरी उड्डाण पुलाला मंजुरी देण्याची मागणी दोन वर्षापूर्वी पालिकेने रेल्वे प्रशासनाकडे केली होती. रेल्वे प्रशासन पालिकेला दाद देत नव्हते. डोंबिवलीतील उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी रेल्वे, शासनाकडे पाठपुरावा करून माणकोली पुलावरून भविष्यातील वाहनांचा भार विचारात घेऊन मोठागाव रेल्वे फाटकावर चार पदरी उड्डाण पूल बांधण्याच्या आराखड्याला मंजुरी देण्यासाठी सलद दोन वर्ष पाठपुरावा केला होता.
पालिका आणि जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे रेल्वेने अखेर मोठागाव रेल्वे फाटकावर चार पदरी रेल्वे उड्डाण पूल बांधण्यास मंजुरी दिली आहे. मूलभूत सोयी सुविधा विकास योजनेंतर्गत शासनाने या पुलासाठी १६८ कोटीचा निधी मंजूर केला आहे. या निधीतील भूसंपादनासाठी ३० कोटी, या पुलाच्या पोहच रस्त्यामुळे बाधित होणाऱ्या ६०० बाधित रहिवाशांच्या पुनर्विकासासाठी १३८ कोटी मंजूर करण्यात आले आहेत.
तांत्रिक मान्यता
- २४ मीटर रस्त्याचे भूसंपादन – ७२ कोटी ७५ लाख
- पुलाचे बांधकाम – ५ कोटी ५८ लाख
- पुलाचे पोहच रस्ते – ८४ कोटी
- देवीचापाडा चकाचक मंदिर येथे पु थ्रु बोगदा – ३ कोटी
रेल्वे फाटकावरील उड्डाण पूल दोन पदरी ऐवजी चार पदरी करावा यासाठी पालिकेसह आपण पाठपुरावा केला. त्याला यश आले . या पुलामुळे बाधित होणाऱ्या ६०० बाधितांना ६८ कोटीची भरपाई दिली जाणार आहे. या पुलाचे काम लवकर सुरू होईल यादृष्टीने रेल्वेकडे पाठपुरावा करणार आहे. – दीपेश म्हात्रे, जिल्हाप्रमुख, ठाकरे गट.
