ठाणे : रेल्वेगाडीत प्रवेश करताना झालेल्या क्षुल्लक वादातून एका प्रवाशाला बेदम मारहाण करणाऱ्या आरोपीला अखेर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या मदतीने शुक्रवारी ठाणे लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद केले. घटनेचे उपलब्ध चित्रीकरण अत्यंत अस्पष्ट आणि पुसट असल्याने आरोपीचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, एआय-आधारित तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आरोपीची माहिती गोळा करुन पोलिसांनी त्याला अटक केली. एआय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आरोपीचा शोध घेण्याची लोहमार्ग पोलीस आयुक्तालयातील ही पहिलीच कारवाई असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

मारुती घुलघुले (५३) असे आरोपीचे नाव असून तो दिवा पूर्व येथे वास्तव्यास आहे. १८ मार्च या दिवशी ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक २ वरुन तक्रारदार हे प्रवास करत होते. कल्याण धिम्या लोकलमध्ये तक्रारदार यांनी प्रवेश केला. त्यांच्याकडील बॅग रॅकवर ठेवत असताना पायाचा धक्का आसनावर बसलेल्या मारुती याला लागला. त्यामुळे मारुती याने त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच त्यांच्या करंगळीचे बोट मोडले. त्यांच्या करंगळीवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांनी मे महिन्यात याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपासामध्ये तक्रारदार यांच्याकडे चित्रीकरण होते. परंतु ते अस्पष्ट होते. त्यामुळे पोलिसांनी ‘एआय’चा आधार घेतला.

एआय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आरोपीची माहिती मिळवित त्याचा माग काढण्यात आला. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी हा दिवा येथे राहत असल्याची माहिती पोलीस पथकाला प्राप्त झाल्यानंतर पथकाने त्याला दिवा येथे जाऊन ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याचे नाव मारुती घुलघुले असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणात त्याला शुक्रवारी अटक झाल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धर्मेंद्र आवारे यांनी सांगितले.

ही कारवाई लोहमार्ग पोलीस आयुक्त राकेश कलासागर, उपायुक्त प्रज्ञा जेडगे, साहाय्यक पोलीस आयुक्त निलीमा कुलकर्णी, ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धर्मेंद्र आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद देशमुख, हवालदार दिवटे, राठोड, साळुंके, पवार, पोलीस शिपाई कागणे, शिंदे, रणसिंग, वाघमोडे, मोरे यांच्या पथकाने केली.