ठाणे : भारतातील पहिल्या रेल्वे सेवेचे केंद्र असलेल्या ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाचा १७२ वा वाढदिवस उद्या, बुधवारी रेल्वे प्रवाशी संघटनांकडून साजरा केला जाणार आहे. या स्थानकाच्या पश्चिमेच यापुर्वीच सॅटीस प्रकल्प राबविण्यात आला आहे तर, पुर्व स्थानक परिसरात सॅटीस प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे स्थानकाचा चेहरा-मोहरा बदलार असून यामुळे हे स्थानक नव्या वर्षात कात टाकणार असल्याचे चित्र आहे.
बोरि बंदर ते ठाणे दरम्यान १६ एप्रिल १८५३ रोजी भारतातील पहिली रेल्वे धावली होती. ३३.८ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी रेल्वेला ५७ मिनिटे लागली होती. त्यामुळे १६ एप्रिलला या रेल्वे सेवेचा वाढदिवस प्रवाशी संघटनांकडून गेल्या काही वर्षांपासून साजरा केला जात आहे. यंदाच्या वर्षीही अशाचप्रकारे ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख आणि पदाधिकारी सुधाकर पतंगराव यांनी रेल्वेचा वाढदिवस करण्याचे ठरविले आहे. हा कार्यक्रम १६ एप्रिलला सकाळी ११ वाजता ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकच्या बाजुला असलेल्या रेल्वे इंजिनजवळ होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के आणि कल्याणचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. या ऐतिहासिक रेल्वेच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी व्हा, असे आवाहन प्रवाशी संघटनेने केले आहे.
ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज लाखो नागरिक प्रवास करतात. पश्चिम स्थानक परिसरातील कोंडी कमी करण्यासाठी यापुर्वीच सॅटीस पुलाची उभारणी करण्यात आली आहे. अशाचप्रकारे पुर्व स्थानक परिसरात ठाणे महापालिका सॅटीस पुलाची उभारणी करीत आहे. या प्रकल्पात तुळजा भवानी मंदिर, पूर्व द्रुतगती महामार्गावरील सेवा रस्ता ते कोपरी कन्हैया नगर, एमजेपी कार्यालयापर्यंत एकूण २.२४ किमी लांबीचा उन्नत मार्ग उभारण्यात आला आहे. यात १२ मीटर रुंद मार्गिका तयार करण्यात आली आहे. स्थानकात वाहतूक व्यवस्थापनासाठी ९ हजार चौरस मीटर डेक उभारणी करण्यात येणार आहे. डेक उन्नत मार्गाला जोडण्यात येणार असून त्यात ‘स्थानक इमारती’चाही समावेश असेल. या ११ मजली इमारतीच्या तळमजल्यावर वाहनतळ, एक मजला रेल्वे सुविधांसाठी तर, एक मजला बस वाहतुकीसाठी वापरला जाणार आहे तर, उर्वरित आठ मजल्यावर व्यापारी संकुल उभारून ते भाड्याने देण्यात येणार आहे. नव्या वर्षात ही कामे पुर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे स्थानक नव्या वर्षात कात टाकणार असल्याचे चित्र आहे.