ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक २ वरील रेल्वेच्या अधिकृत ऑरिजिन उपाहारगृहातील अस्वच्छतेबाबत डीआरयूसीसी समितीच्या पाहणीत गंभीर अनियमितता उघड झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत आणखी एक धक्कादायक प्रकार उघड झाला. उपाहारगृहात साठवून ठेवलेले टोमॅटो उंदीर कुरतडत असल्याचाी ध्वनिचित्रफित समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली आहे. यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक २ येथे भव्य प्रतीक्षागृह उभारण्यात आले होते. मात्र, यानंतर प्रवाशांच्या दृष्टीने या ठिकाणी रेल्वेच्या माध्यमातुन उपाहारगृह सुरू करण्यात आली. प्रशस्त जागा व आसनांमुळे या ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी होते. मात्र, गेले काही दिवस उपाहारगृहातील स्थितीबाबत प्रवाशांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे वापरकर्ता सल्लागार समिती (डीआरयूसीसी) चे सदस्य संजीव कुलकर्णी व शिवसेना ठाणे शहर विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे यांनी उपाहारगृहाची प्रत्यक्ष पाहणी केली.

पाहणीदरम्यान मुदत संपलेली शीतपेये व इतर खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे आढळले. अस्वच्छ स्वयंपाकगृह, दुर्गंधी, मुदतबाह्य खाद्यपदार्थ, कीड लागलेला भाजीपाला, वारंवार वापरलेले खाद्यतेल तसेच अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळून आले होते. अशा प्रकारामुळे दररोज हजारो प्रवाशांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत असल्याची बाब पाहणीत उघडकीस आली.

उपाहारगृहात विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या खाद्यपदार्थांचा दर्जाही अत्यंत निकृष्ट असल्याचे पाहणीत स्पष्ट झाले. या प्रकरणी संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले असून, रेल्वे प्रशासनाकडे तातडीने चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

आरोग्याबाबत चिंता

समाज माध्यमांवरील ध्वनिचित्रफितीत उपाहारगृहातील टोमॅटोवरून उंदीर मुक्तपणे वावरताना आणि ते कुरतडताना दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. ही ध्वनिचित्रफित समाजमाध्यमांवर वेगाने प्रसारित होत असून, अधिकृत उपाहारगृहातील स्वच्छता व अन्नसुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या घटनेवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रवाशांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड होऊ नये, संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच कॅन्टीनची नियमित तपासणी करून स्वच्छतेचे निकष काटेकोरपणे पाळावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.