ठाणे : मध्य रेल्वे स्थानकातील सर्वाधिक गजबजलेल्या ठाणे रेल्वे स्थानक परिसरात गांजा या अमली पदार्थाची नशा करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ठाणे पोलिसांनी नुकतेच याप्रकरणात एकाला ताब्यात घेतले आहे. अवघ्या २२ वर्षांच्या या तरुणाकडून गांजाचे पाकिट, चिलीम यासारख्या वस्तू आढळून आल्या. त्यामुळे स्थानक परिसरात नशेखोरांपासून प्रवासी सुरक्षित आहेत का हा प्रश्न विचारला जात आहे. नशेबाजी करणाऱ्यांचा त्रास वाढला असून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून दिवसाला अंदाजे सहा ते सात लाख प्रवासी दैनंदिन प्रवास करतात. सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांपैकी एक ठाणे रेल्वे स्थानक आहे. परंतु ठाणे रेल्वे स्थानकाच्या आवारात काही बेशिस्त रिक्षा चालक, भिक्षेकरु यांचा विळखा असतो. आता नशेबाजी करणाऱ्यांचे प्रमाण देखील स्थानक परिसरात वाढले आहे. ठाणेनगर पोलिसांनी नुकतेच एका नशेखोराला ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, ५ एप्रिलला रात्री ११ वाजता ठाणेनगर पोलिसांचे पथक स्थानक परिसरात गस्ती घालत होते. त्यावेळी स्थानका बाहेरी एसटी थांब्याजवळ एक व्यक्ती नशा करत असल्याचे त्यांना आढळून आले. पथकाने तात्काळ त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव अजमल शेख (२२) असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून एक आगपेटी, गांजा या अमली पदार्थाचे पाकिट, चिलीम असे साहित्य जप्त केले. पोलिसांना तो गांजाचे सेवन केल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी त्याच्याविरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे त्याच्याविरोधात गुंगीकारक औषधीदव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे प्रदार्थ अधिनियम, १९८५ – २७, ८ (सी) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.