ठाणे – ठाणे रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी फलाट क्रमांक पाच – सहावरील सरकता जिना अचानक बंद पडला. यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. त्याचा परिणाम स्थानकातील एका अरूंद पादचारी पूलावर होऊन पादचारी पूलाच्या जिन्यावर प्रवाशांची चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. दुपारी उशीरापर्यंत हा सरकता जिना दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू होते.

लोकल गाडी ही लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी आहे. ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला सुमारे पाच लाख प्रवासी ये-जा करत असतात. तसेच गेल्या काही वर्षांमध्ये कर्जत, बदलापूर या परिसरातील लोकवस्तीत झपाट्याने वाढ झाली आहे. येथील बहुतेक प्रवासी मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथे नोकरीकरिता येत असतात. इतर मार्गाने प्रवास करणे अधिक खर्चिक असल्याने हे प्रवासी रेल्वे वाहतुकीला प्राधान्य देतात. सकाळी आणि सायंकाळच्यावेळी या कर्जतला जाणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते. हे प्रवासी ठाण्यात उतरून पुढे नवी मुंबई भागात किंवा शहरातील परिसरात नोकरीसाठी जातात. स्थानकातील फलाट क्रमांक पाचवरून मुंबईहून कल्याण-कर्जत, कसारा येथे जाणाऱ्या उपनगरीय रेल्वेगाड्या थांबत असतात. तर फलाट क्रमांक सहावर कल्याणहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या उपनगरीय रेल्वेगाड्या थांबत असतात. त्यामुळे या फलाटांवर दररोज प्रवाशांची गर्दी होत असते.

सकाळच्या वेळेत नोकरीच्या ठिकाणी जाण्याची प्रत्येक प्रवाशाची घाई असते. त्यामुळे प्रवासी जिन्याच्या पायऱ्या चढून जाण्यापेक्षा झटपट सरकत्या जिन्या रेल्वे स्कायवाॅक आणि तेथून फलाटावर जाण्यासाठी प्रयत्नशील असतो. त्यात सोमवारी सकाळी फलाट क्रमांक पाच आणि सहामध्ये असलेला एक सरकता जिना तांत्रिक बिघाडामुळे अचानक बंद पडला होता.

त्यात यादरम्यान एक एक्सप्रेस गाडी देखील आली होती. सरकत्या जिन्याजवळ प्रवासी आले असता जिना बंद असल्याचे दिसले. त्यामुळे पुन्हा माघारी फिरून इतर जिन्याने जाण्यापेक्षा सरकत्या जिन्याच्या पायऱ्यांवरून पायी चालत प्रवाशांनी प्रवास केला. गावावरून आलेल्या प्रवाशांना जड सामान घेऊन जिन्यावरून चालत प्रवास करावा लागला.यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. यानंतर दुपारी उशीरापर्यंत हा सरकता जिना दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू होते. दुपारी १ वाजताच्या दरम्यान सरकता जिना सुरू करण्यात आला.