ठाणे : देशातील सर्वाधिक गर्दीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या ठाणे स्थानकात प्रवाशांसाठी नव्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. फलाट क्रमांक पाच व सहावर सीएसएमटी दिशेकडे जाण्यासाठी नवीन सरकता जिना उभारण्यात आला आहे. तसेच, फलाट क्रमांक दोनवर नव्याने स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. या दोन्ही सुविधांचे लोकार्पण खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते गुरुवारी होणार असून, लोकार्पणानंतर प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि मोफत स्वच्छतागृह सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने २०२३ पासून डी-मार्ट फाऊंडेशन आणि मध्य रेल्वे संयुक्तपणे काम करीत आहेत. या उपक्रमांतर्गत सीएसएमटी, भायखळा, घाटकोपर आणि कल्याण रेल्वे स्थानकांवर यापूर्वीच नवीन स्वच्छतागृहांचे ब्लॉक प्रवाशांच्या सेवेत दाखल झाले आहेत.
आता या उपक्रमाचा विस्तार ठाणे रेल्वे स्थानकात करण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत जुन्या स्वच्छतागृहांच्या ब्लॉकचे नूतनीकरण करण्याऐवजी ते हटवून डी-मार्ट फाऊंडेशनकडून नवीन स्वच्छतागृह उभारण्यात येत आहेत. या सुविधेचे वैशिष्ट्य म्हणजे स्वच्छतेसाठी येथे २४ तास कर्मचारी उपलब्ध असणार आहेत. प्रवाशांना या स्वच्छतागृहाचा वापर पूर्णपणे विनामूल्य करता येणार आहे.
स्वच्छतागृहासाठी आवश्यक पाणी आणि वीजपुरवठा तसेच मलनिस्सारण आणि स्वच्छतेशी संबंधित देखभालीची जबाबदारी मध्य रेल्वे प्रशासनाकडे असणार आहे. दरम्यान, ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाच आणि सहासाठी उभारण्यात आलेला नवीन सरकता जिना प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सीएसएमटी दिशेकडील पादचारी पूल क्रमांक एक येथे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सरकत्या जिन्याची उभारणी करताना अस्तित्वातील जिन्याच्या वापरात अडथळा निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. जुन्या जिन्याच्या दोन्ही बाजूंना डेकची व्यवस्था करण्यात आली असून, प्रवाशांना नवीन सरकत्या जिन्यासोबतच जुन्या जिन्याचाही वापर करता येणार आहे.
