ठाणे : लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या एकाचवेळी ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक ५ व ६ वर आल्यानंतर होणारी गर्दी, तसेच जिन्यांचा वापर करताना प्रवाशांची होणारी गैरसोय आता काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. फलाट क्रमांक ५ व ६ साठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेकडील पहिल्या पादचारी पुलावर नवा सरकता जिना उभारण्यात आला आहे. शिवाय, फलाट क्रमांक २ वर डी मार्ट फाऊंडेशनच्या माध्यमातून उभारण्यात आलेले निःशुल्क स्वच्छतागृहही प्रवाशांसाठी खुले करण्यात आले आहे. या दोन्ही सुविधांचे गुरुवारी खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
स्थानकात सामानासह जिने चढताना व उतरताना ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे नवा सरकता जिना उभारण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात होती. खासदार नरेश म्हस्के यांनी यासाठी रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर रेल्वेने या ठिकाणी सरकत्या जिन्याची उभारणी केली.
या सरकत्या जिन्याची उभारणी करताना अस्तित्वातील जिन्याच्या वापरावर परिणाम होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. जुन्या जिन्याच्या दोन्ही बाजूंना उतरणीच्या मार्गाची व्यवस्था करण्यात आली असून, त्यामुळे प्रवाशांना सरकता जिना व पारंपरिक जिना अशा दोन्ही सुविधांचा एकाच वेळी वापर करता येणार आहे.
दरम्यान, ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक २ वर डी मार्ट फाऊंडेशनच्या सामाजिक दायित्व निधीतून नि:शुल्क स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे. मध्य रेल्वे व डी मार्ट फाऊंडेशन यांनी मिळून हा उपक्रम राबविला आहे. या स्वच्छतागृहात चोवीस तास स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती असणार असून, प्रवाशांना त्याचा विनामूल्य वापर करता येणार आहे. स्वच्छतागृहासाठी आवश्यक पाणी, वीज, सांडपाणी वाहिनी आणि देखभालीची जबाबदारी मध्य रेल्वे प्रशासनाकडे राहणार आहे.
याशिवाय, ठाणे रेल्वे स्थानकातील सर्व फलाटांच्या स्वच्छतेची कामेही डी मार्ट फाऊंडेशनच्या माध्यमातून केली जाणार आहेत. त्यामुळे स्थानकातील स्वच्छतेचा दर्जा सुधारण्यास मदत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या लोकार्पण सोहळ्याला शहरप्रमुख हेमंत पवार, विलास जोशी, नगरसेवक सुधीर कोकाटे, संजय वाघोले, ठाणे लोकसभा सचिव बाळा गवस,
डी मार्ट फाऊंडेशनचे प्रमुख जयदीप सोमण, ठाणे रेल्वे स्थानक व्यवस्थापक अपर्णा देवधर यांच्यासह रेल्वेचे अधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी आणि प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
