Assault on Lady TC at Thane Railway Station: ठाणे रेल्वे स्थानकात एका प्रवासीला तिकीट विचारले असता, तिने महिला मुख्य तिकीट तपासणीस ( हेड टीसी) यांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या १८ वर्षीय मुलीला ठाणे लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी, तसेच मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारामुळे ठाणे रेल्वे स्थानक परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.
ठाणे रेल्वे स्थानकातील मुंबई दिशेकडील पादचारी पूलावर सोमवारी सकाळी ३९ वर्षीय हेड टीसी या प्रवाशांच्या तिकीट तपासत होत्या. त्यावेळी १८ वर्षीय मुलगी तिच्या मोबाईलवर बोलत पादचारी पूलावरून जात होती. तिला महिला टीसीने तिकीटाबाबत विचारले. त्यावेळी तिने मी येथेच राहत असून पादचारी पूलावरुन ओलांडून पलिकडच्या दिशेने जात असल्याचे तिने सांगितले. त्यामुळे टीसी यांनी तिचा पत्ता पाहण्यासाठी तिच्याकडून आधारकार्डची मागणी केली. परंतु ती पॅन कार्ड दाखवू लागली. त्यामुळे टीसी यांनी पुन्हा तिच्याकडून आधारकार्डची मागणी केली. त्यावेळी तिने मोबाईलवर संपर्क साधलेल्या व्यक्तीशी बोलताना टीसी यांना शिवीगाळ करत आधारकार्ड व्हाॅट्सॲपवर पाठविण्यास सांगितले. टीसी यांनी तिला शिवीगाळ करु नकोस असे सांगितले असता, तिने अचानक हातातील मोबाईल फोनने टीसी यांना मारहाण सुरु केली. तसेच तिने टीसी यांच्या चेहऱ्यावर नखाने खरचटले.
त्यानंतर टीसी यांनी तिला ठाणे स्थानकातील व्यवस्थापकांच्या दालनात नेले. तिची चौकशी केली असता, ती महिला घरकाम आणि ब्यूटीशियनचा व्यवसाय करत असून वागळे इस्टेट भागातील रहिवासी असल्याचे समोर आले. ठाणे लोहमार्ग पोलीस आल्यानंतर टीसी यांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे त्या मुलीविरोधात भारतीय रेल्वे अधिनियम, १९८९ चे कलम १४७ आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ चे कलम १२१ (१), १३२, ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
