ठाणे : टिटवाळा येथून मुंबईच्या दिशेने लोकलने प्रवास करणाऱ्या एका गर्भवती महिलेची ठाणे रेल्वे स्थानकात सायंकाळी ४.३० वाजल्याच्या सुमारास लोकलच्या महिला डब्यातच सुखरूप प्रसूती झाली. या घटनेमुळे काही काळ रेल्वे स्थानक परिसरात धावपळ उडाली होती. मात्र रेल्वे प्रशासन, महिला प्रवासी आणि वैद्यकीय यंत्रणेच्या तत्परतेमुळे आई आणि नवजात कन्या दोघांनाही तातडीने उपचार मिळाल्याने सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित महिला टिटवाळा येथून मुंबईच्या दिशेने टिटवाळा – मुंबई लोकलने प्रवास करत होती. डोंबिवली रेल्वे स्थानक सोडल्यानंतर अचानक तिला प्रसूतीच्या तीव्र कळा सुरू झाल्या. यामुळे डब्यातील महिला प्रवाशांनी तिच्या मदतीसाठी तत्काळ धाव घेतली. दरम्यान, लोकल ठाणे रेल्वे स्थानकात पोहोचताच महिला डब्यातच तिची प्रसूती झाली आणि तिने एका गोंडस कन्येला जन्म दिला.

घटनेची माहिती मिळताच ठाणे रेल्वे स्थानक प्रशासन, रेल्वे कर्मचारी आणि संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. प्राथमिक मदत उपलब्ध करून देत आई आणि नवजात बालिकेला त्वरित रुग्णवाहिकेद्वारे कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी आई आणि नवजात बालिकेवर आवश्यक वैद्यकीय उपचार केले. सध्या दोघांचीही प्रकृती उत्तम असून कोणताही धोका नसल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली आहे.

रेल्वे प्रवासादरम्यान घडलेल्या या अनपेक्षित घटनेत महिला प्रवाशांनी दाखवलेली तत्परता, तसेच रेल्वे प्रशासन आणि वैद्यकीय यंत्रणेने केलेली जलद कार्यवाही यामुळे माता आणि नवजात बालिकेला वेळेत उपचार मिळू शकले.