ठाणे : शहरातील अत्यंत वर्दळीचा परिसर असलेल्या ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील एका औषधविक्रीच्या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी तब्बल दोन लाख पाच हजार रुपयांची रोकड लंपास केली. विशेष म्हणजे, दुकानातील चोरीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद होऊ नये यासाठी चोरट्यांनी सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआरदेखील चोरून नेला. या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे रेल्वे स्थानकाजवळ बी. के. बीन रिक्षा थांब्याच्या परिसरात हे औषधविक्रीचे दुकान आहे. दुकानाच्या मालकाने ४ सप्टेंबर रोजी कामगारांना वेतन देण्यासाठी दोन लाख पाच हजार रुपयांची रोकड दुकानात ठेवली होती. त्यानंतर रात्रीच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकान बंद करून मालक घरी गेले. दरम्यान, रात्रीच्या वेळी चोरट्यांनी दुकानाला लक्ष्य केले. चोरट्यांनी दुकानाच्या शटरच्या खालच्या भागाला तोडून आत प्रवेश केला. दुकानातील रोकड शोधून काढल्यानंतर चोरट्यांनी दोन लाख पाच हजार रुपये घेऊन पोबारा केला. चोरी केल्यानंतर दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रण ज्या डीव्हीआरमध्ये साठवले जाते, तो डीव्हीआरही चोरट्यांनी सोबत नेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास दुकानाचा मालक दुकानाबाहेर आला असता शटरच्या खालच्या भागाचा पत्रा तुटलेल्या अवस्थेत दिसून आला. संशय आल्याने त्यांनी दुकानात जाऊन पाहणी केली. त्यावेळी दुकानात ठेवलेली दोन लाख पाच हजार रुपयांची रोकड गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआरही चोरीला गेल्याचे आढळून आले. या प्रकारानंतर दुकान मालकाने नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ मधील कलम ३०५ (अ), ३३१ (३) आणि ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दुकानाच्या परिसरातील तसेच आजूबाजूच्या भागातील सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.