ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक परिसरात सूक्ष्म भुयारी तंत्रज्ञानाच्या आधारे उपाययोजना करण्यात आल्या असून स्थानकात रेल्वे रुळांवर पाणी साचण्याच्या समस्येपासून यावर्षी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ठाणे रेल्वे स्थानकात खासदार नरेश म्हस्के आणि मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) हिरेश मीना यांंनी स्थानकाची संयुक्त पाहणी केली. तसेच, स्थानकातील विविध कामांचा आढावा घेण्यात आला. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील सॅटीस प्रकल्पाची कामेही लवकरच पूर्ण करणार असल्याचेही यावेळी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

ठाणे रेल्वे स्थानकातील रुळांवर पावसाळ्यात पाणी साचत असते. परंतु स्थानक परिसरात रेल्वेने सूक्ष्म भुयारी तंत्रज्ञानाच्या आधारे काम झाल्याने पाणी साचण्याची समस्या दूर होणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. डी-मार्टच्या सीएसआर निधीतून ठाणे रेल्वे स्थानकावर स्वच्छतागृह उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र या कामात मोठी दिरंगाई होत असल्याबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे प्रशासनाकडे नाराजी व्यक्त करण्यात आली. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता हे कामे तातडीने पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली.

स्थानकातील फलाट क्रमांक ५ आणि ६ वरील सरकत्या जिन्यांचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने त्यालाही गती देण्याची मागणी करण्यात आली. तसेच पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण करून पाणी तुंबण्याची समस्या टाळण्याची सूचना म्हस्के यांनी केली. लवकरच ठाणे स्थानकावर १५ डब्यांच्या लोकल गाड्या सुरू होणार असल्याने फलाटाची लांबी वाढवण्याचे काम वेगाने पूर्ण करण्याबाबत चर्चा झाली.

ठाणे रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण विकास, प्रवाशांच्या सुविधा आणि भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन विविध विकासकामे सुरू आहेत. त्यासाठी आवश्यक निधीही मंजूर झाला आहे. रेल्वे प्रशासनासमवेत सकारात्मक चर्चा झाली असून कामे तातडीने सुरु होऊन प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल. – नरेश म्हस्के, खासदार, ठाणे लोकसभा.

ठाणे रेल्वे स्थानकात विविध प्रकारची विकासकामे सध्या सुरू आहेत. प्रवाशांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेत ही कामे वेगाने पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. काही मोठ्या प्रकल्पांना, विशेषत सॅटीस सारख्या कामांना थोडा वेळ लागणार असला तरी ते कामे शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. पावसाळ्यापूर्वीची सर्व आवश्यक कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही विशेष लक्ष देत आहोत. रेल्वे सेवा सुरळीत ठेवणे आणि गाड्या वेळेत सोडणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. त्या दृष्टीने जे काही अडथळे किंवा समस्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने दूर करण्याचे काम सुरू आहे. – हिरेश मीना, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे.