बेशिस्त पार्किंगचा ताप कायम

रेल्वे स्थानकात उभारण्यात आलेल्या पार्किंग प्लाझाला अद्यापही कंत्राटदार मिळाला नसल्याने येथील वाहनतळाची अवस्था बिकट झालेली आहे. सकाळी बेशिस्तपणे लावलेल्या दुचाकी काढण्यासाठी रात्रीच्या वेळी जागाच शिल्लक राहत नाही. त्यामुळे अनेक चालक थेट फलाट क्रमांक एकवरूनच गाडी बाहेर काढत आहेत. विशेष म्हणजे, मध्य रेल्वेने यासाठी तिसऱ्यांदा निविदा काढूनही कंत्राटदारांनी त्यात स्वारस्य दाखविलेले नाही.

गेल्या काही वर्षांत खासगी वाहनाने हजारो प्रवासी ठाणे रेल्वे स्थानकात ये-जा करत असतात. त्यामुळे येथे पार्किंग प्लाझा उभारण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेण्यात आला. या पार्किंग प्लाझाचे काही महिन्यांपूर्वीच उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर एका कंत्राटदाराला तो तीन महिने चालविण्यासाठी देण्यात आला, मात्र त्या कंत्राटदाराचे कंत्राट संपून दीड महिना उलटला तरीही या वाहनतळासाठी कंत्राटदार मिळालेला नाही. त्यामुळे येथील वाहने बेशिस्त पद्धतीने उभी करण्यात येत आहेत. चारच दिवसांपूर्वी मध्य रेल्वेने यासंबंधी तिसरी निविदा काढली. मात्र कंत्राटदारांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. कंत्राटदाराने मध्य रेल्वेकडे जमा करावयाची रक्कम अधिक असल्याने या निविदेला पसंती मिळत नसल्याचे मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

यातच आता फलाट क्रमांक एकजवळ असलेल्या प्रवेशद्वारासमोरच अस्ताव्यस्त दुचाकी उभ्या करण्यात येत आहेत. त्यामुळे दुचाकी काढणे शक्य होत नाही. यावर उपाय म्हणून अनेक चालक चक्क फलाट क्रमांक एकवरून दुचाकी काढतात. फलाट क्रमांक एकपासून काही अंतरावर उतार करण्यात आला आहे. त्यामुळे तिथून थेट बाहेर पडण्याचा नवा मार्ग या दुचाकी चालकांनी अवलंबिला आहे.

बेकायदा पार्किंगआड दारूअड्डा

स्थानक परिसरात अत्यंत दाटीवाटीने आणि बेशिस्तपणे उभ्या असलेल्या या वाहनांच्या आडोशाचा गैरफायदा काही तळीराम घेतात. त्यामुळे या भागात अनेकदा दारूच्या बाटल्या आढळतात. खासदार राजन विचारे यांनीही रेल्वे सुरक्षा दलाला याविषयी माहिती दिली आहे.