ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील एका गृहसंकुलात ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी छापा टाकून तीन महिलांची सुटका केली असून स्पा चालक आणि स्पा मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला सॅटीस पुलाजवळ असलेल्या एका गृहसंकुलाच्या पहिल्या मजल्यावर ‘ओरिओ स्पा अँड सलून’ नावाचे स्पा पार्लर सुरू आहे. या ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती नौपाडा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ३ जुलै रोजी पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने स्पावर छापा टाकला. कारवाईदरम्यान स्पामध्ये एक महिला सोफ्यावर बसलेली आढळली. चौकशीत ती मूळची आंध्र प्रदेशातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी स्पा चालक ललित रगाणी याला ताब्यात घेऊन चौकशी केली. स्पाच्या आतील भागात आणखी एक महिला आढळून आली. तीही आंध्र प्रदेशातील असल्याचे समोर आले. याशिवाय मूळची नेपाळची असलेली एक तरुणीही तेथे आढळली.
सुटका करण्यात आलेल्या महिलांच्या चौकशीत, प्रत्येक ग्राहकाकडून मिळणाऱ्या पाच हजार रुपयांपैकी एक हजार रुपये महिलांना, तर उर्वरित चार हजार रुपये स्पा चालक आणि स्पा मालक घेत असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी स्पा चालक ललित रगाणी आणि स्पा मालक मनीषा कदम यांच्याविरोधात स्त्रीया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ (सिट अधिनियम पुननिर्मित) – ३,४,५ आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ चे कलम १४३ (१), १४३ (३), ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
