ठाणे : पश्चिम रेल्वे मार्गावर मयंक लोहार या तरुणाची रेल्वे डब्यात क्षुल्लक कारणावरून प्रवाशांसमोर हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच, ठाणे रेल्वे स्थानकात मध्यरात्री एका प्रवाशाकडे कोयता आढळून आला. याप्रकरणी त्या प्रवाशाविरोधात ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याने हा कोयता कशासाठी आणला होता, याचा तपास पोलीस करत आहेत.
काही दिवसांपूर्वी पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर मयंक लोहार याची हत्या झाली होती. भरधाव लोकलमध्ये प्रवाशांसमोरच एकाने त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या केली होती. या घटनेचे चित्रीकरण समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले होते. तसेच, रेल्वेतील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. हत्याकांडानंतर सर्वच रेल्वे स्थानकात लोहमार्ग पोलिसांकडून संशयास्पद व्यक्तींची तपासणी केली जात आहे.
ठाणे रेल्वे स्थानकात लोहमार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी शनिवारी मध्यरात्री गस्त घालत होते. त्यावेळी फलाट क्रमांक ५ आणि ६ मध्ये असलेल्या सरकत्या जिन्याखाली एक व्यक्ती पोलीस पथकाला संशयास्पद आढळून आला. त्याची झडती घेतली असता, त्याच्या कंबरेला कोयता आढळून आला. पथकाने त्याला ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या चौकीत चौकशीसाठी आणले.
त्यावेळी तो ठाण्यातील वर्तकनगर भागातील असल्याचे समोर आले. याप्रकरणी त्याच्याविरोधात लोहमार्ग पोलीस ठाण्यातील कर्मचारी तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे शस्त्र अधिनियम, १९५९ चे कलम २५, ४ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १३५, ३७ (१) (क) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. त्याने हा कोयता कशासाठी आणला याचा तपास पोलीस करत आहेत.
