ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील सॅटीस पुलाला जोडणाऱ्या पादचारी पुलावरील छताचा बहुतांश भाग गायब असल्याने प्रवाशांना भर पावसात भिजत ये-जा करण्याची वेळ आली आहे. दररोज हजारो प्रवासी या पुलाचा वापर करतात. मात्र, छत नसल्यामुळे पावसाचा थेट मारा सहन करत प्रवास करावा लागत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक नियोजन आणि प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे स्थानकाच्या पश्चिमेला सॅटीस पूल उभारण्यात आला आहे. या पुलावर टीएमटी परिवहन सेवेच्या बसगाड्यांचा प्रमुख थांबा असून, पुलाखाली रिक्षा थांबा आहे. त्यामुळे रेल्वे, बस आणि रिक्षा या तिन्ही वाहतूक व्यवस्थांमध्ये प्रवाशांसाठी सॅटीस पूल महत्त्वाचा आहे.

दररोज लाखो प्रवासी या पुलावरून रेल्वे स्थानक, गावदेवी मंदिर परिसर, एसटी थांबा, टीएमटी थांबा येथे जाण्यासाठी पुलाचा वापर करतात. मात्र, मागील काही महिन्यांपासून सॅटीसला जोडणाऱ्या पादचारी पुलावरील छताचे पत्रे तुटत आहेत. परिणामी, पुलावरील बहुतांश भागावरील छत गायब झाले असून पावसाळ्यात प्रवाशांना कोणत्याही संरक्षणाशिवाय चालावे लागत आहे. मुसळधार पावसाच्या वेळी अनेक जणांना पुलावरच छत्री उघडून चालावे लागत असल्याने गर्दीत याचा त्रास प्रवाशांना होतो.

ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि दिव्यांग प्रवाशांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाचे पाणी पुलावर साचत असल्याने निसरड्या फरशांवरून प्रवासी घसरुन अपघात होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. स्थानक परिसरातील सॅटीस पुलाची दुरवस्था असूनही संबंधित यंत्रणेकडून तातडीने दुरुस्ती झाली नसल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

ठाणे रेल्वे स्थानकात सॅटीस पूल अत्यंत महत्त्वाचा आहे. मागील अनेक महिन्यांपासून येथील छत गायब झालेले आहे. उन्हाळ्यात उन्हाचे चटके सहन करावा लागले होते. आता पावसाळा सुरू झाल्यानंतर पाऊसाचा मारा सहन करावा लागत आहे. महापालिकेने याकडे गंभीर लक्ष देणे आवश्यक आहे.

  • रुपेश भोईर, प्रवासी.