ठाणे : ठाणे जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यासाठी ”रेड अलर्ट” जारी केला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ठाणे जिल्ह्यातील सर्व धबधबे, गडकिल्ले, धरणे, तलाव, नद्या तसेच इतर पर्यटनस्थळांवर पुढील आदेशापर्यंत नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत हा आदेश जारी केला आहे. आदेशानुसार जिल्ह्यात सध्या अतिवृष्टीची परिस्थिती असून अनेक ठिकाणी पाणी साचणे, झाडे कोसळणे, वाहतुकीस अडथळे निर्माण होणे अशा घटना घडत आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळी जाणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
पावसाळ्यात ठाणे जिल्ह्यातील धबधबे, धरणे, तलाव, नद्या अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असते. मात्र, अशा ठिकाणी दरवर्षी दरडी कोसळणे, पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणे, धरणे व तलावांमध्ये बुडण्याच्या घटना, तसेच निसरड्या पायवाटांमुळे अपघात होऊन जीवितहानी झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने दिलेला रेड अलर्ट आणि सुरू असलेली अतिवृष्टी लक्षात घेऊन पर्यटनस्थळांवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व धबधबे, गडकिल्ले, धरणे, तलाव, नद्या आणि तत्सम पर्यटनस्थळांवर पुढील आदेश होईपर्यंत नागरिकांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे. संबंधित पर्यटनस्थळांचे व्यवस्थापन पाहणाऱ्या शासकीय विभागांना या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले असून, बंदीबाबत सूचना फलक लावणे, आवश्यक तेथे बॅरिकेडिंग करणे आणि नागरिकांना प्रवेश रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही तास ठाणे जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले असून, काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारची जोखीम न पत्करता धबधबे, नद्या, तलाव, धरणे आणि गडकिल्ल्यांकडे जाणे टाळावे, प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि केवळ अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
