ठाणे : ठाणे जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असतानाच भारतीय हवामान विभागाने सोमवारी ठाणे जिल्ह्यासह मुंबई महानगर क्षेत्रासाठी ”रेड अलर्ट” जारी केला आहे. पुढील काही तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, तसेच ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत शासकीय कार्यालयांना अर्ध्या दिवसानंतर सुट्टी जाहीर केली असून सर्व खासगी कार्यालयांना ”वर्क फ्रॉम होम” करण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत हा आदेश जारी केला आहे. त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज, सोमवार, ६ जुलै रोजी अर्ध्या दिवसानंतर कार्यालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर सर्व खासगी आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांना शक्यतो ”वर्क फ्रॉम होम” सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचणे, झाडे कोसळणे, वाहतुकीला अडथळे निर्माण होणे आणि रस्त्यांवर पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत. तसेच रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कार्यालयीन गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अत्यावश्यक सेवांमधील अधिकारी आणि कर्मचारी मात्र नियमितपणे कार्यरत राहतील. तसेच महापालिका, नगरपालिकांमधील आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य, अग्निशमन, पाणीपुरवठा आणि इतर अत्यावश्यक सेवांबाबत संबंधित विभागप्रमुख स्वतंत्र निर्णय घेणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक घराबाहेर पडू नये, पूरप्रवण भाग, नदी-नाले आणि धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे तसेच हवामान विभाग आणि प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.
