ठाणे – मुंबई हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार ठाणे शहरात मुसळधार पाऊस पडत असून या पावसादरम्यान, कळवा येथील खारीगाव भागात झाड कोसळून दुचाकीवरील दोनजण जखमी झाले आहेत. या दोघांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेच्या निमित्ताने शहरातील झाडे कोसळण्याचे सत्र सुरूच असल्याने नागरिकांच्या जिवीताचा धोका वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.

मुंबई हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी शनिवार, ४ जुलै आणि रविवार, ५ जुलैला रेड अलर्ट जाहीर केला आहे. शनिवार सकाळपासून जिल्ह्यात पाऊस सुरू असून त्या पावसाचा जोर हळूहळू वाढू लागला आहे. त्यामुळे हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज आता खरा ठरताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून ठाणे जिल्हा प्रशासनाने शनिवार, ४ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या तसेच प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

अत्यावश्यक काम नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्याला प्रतिसाद देत अनेकांनी घराबाहेर टाळ पडणे टाळले असल्यामुळे रस्त्यावर वाहनांची संख्या कमी आहे. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडीत अद्याप तरी झालेली नाही. याच मुसळधार पावसादरम्यान, दोन दुचाकींवर झाड पडून दोन जण जखमी झाल्याचा प्रकार ठाण्यातील खारीगाव परिसरात उघडकीस आला.

विजय पली (३२) आणि राजकुमार यादव (३४) अशी या घटनेत जखमी झालेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत. दिवा येथील साबेगाव परिसरात विजय हे राहतात. तर, राजकुमार हे कळवा पुर्व भागात राहतात. हे दोघे आपआपल्या दुचाकीवरून शनिवारी सकाळी कळवा खारेगाव परिसरातून जात होते. त्यावेळी खारेगाव नाका परिसरात या दोघांच्या दुचाकीवर मुसळधार पावसादरम्यान झाड कोसळले. यात दोघे जखमी झाले.

स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन त्यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. विजय यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे तर, राजकुमार यांच्या छातीला आणि कमरेला दुखापत झाली आहे. ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाने झाड कापून बाजूला केले आणि या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू केली.