ठाणे : ठाणे शहरात शुक्रवारी दुपारपर्यंत केवळ २३.१२ मिमी पावसाची नोंद झाली. हा पाऊस मुसळधार नसतानाही शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे तुरळक पावसातच शहराची अशी अवस्था होत असेल, तर मुसळधार पावसाच्या वेळी ठाण्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

ठाणे शहरात शुक्रवारी सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० यावेळेत २३.१२ मीमी पावसाची नोंद झाली. तरी ठाणे बाजारपेठ, घोडबंदर मार्ग, वंदना सिनेमागृह परिसर, कापूरबावडी, साकेत आणि इतर सखल भागांमध्ये पावसाचे पाणी साचले. त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला, तर पादचाऱ्यांनाही

गैरसोय झाली. ठाणे बाजारपेठेत खारकरआळीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर पाणी साचले होते. त्यामुळे बाजारपेठेत दुकानदार आणि खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचे हाल झाले. इतर भागातही पादचारी आणि वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागला. काही ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात होता. वाहन चालकांनाही जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत असल्याचे चित्र होते. पावसाचा जोर कमी असतानाही रस्त्यावर पाणी तुंबत असल्याने मुसळधार पाऊस झाल्यास ठाणे शहराची स्थिती चिंताजनक होण्याची भिती नागरिक व्यक्त करत आहेत.