ठाणे : जिल्ह्यात सोमवारी मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक दुर्घटना घडल्या. भिवंडी येथे १२ वर्षीय मुलगा नाल्यात वाहून गेला, तर ठाण्यात वृक्ष कोसळून एकजण जखमी झाला. पडलेला वृक्ष हटविताना कटर यंत्राचा धक्का लागून अग्निशमन दलाचा एक कर्मचारीही जखमी झाला. पोखरण रोड क्रमांक २ येथे जाहिरातीचे होर्डिंग कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. कल्याणमध्ये चाळीतील घर कोसळून एक महिला जखमी झाली.
ठाणे शहरात सोमवार दुपारपर्यंत १०७ वृक्ष उन्मळून पडले, तर १८ वृक्ष धोकादायक स्थितीत असल्याचे आढळून आले. अनेक सखल भागांत पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. भिवंडीतील सुमारे १५० ते २०० घरांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांचे मोठे हाल झाले. उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने बदलापूर परिसरात पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील विविध भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. कसारा घाट परिसरात रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने काही काळ रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. मात्र, रेल्वे प्रशासनाने तातडीने दरडीतील दगड-माती हटवून वाहतूक पूर्ववत केली. दरम्यान, संभाव्य आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी गडकिल्ले, धबधबे, तलाव, नद्या आणि इतर धोकादायक पर्यटनस्थळांवर पर्यटकांच्या प्रवेशास बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ)च्या दोन तुकड्या आणि ३० अधिकारी व जवान ठाणे जिल्ह्यात तैनात करण्यात आले आहेत.
ठाणे जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या आकडेवारीनुसार, सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार, जिल्ह्यात मागील २४ तासांत २३७.६३ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. ठाणे शहरात सोमवारी दुपारपर्यंत १०७ वृक्षांची पडझड झाली. तर १८ वृक्ष धोकादायक स्थितीत आढळून आले. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले होते. तीन हात नाका येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ अंगावर वृक्ष कोसळून पांडुरंग भुवड हे गंभीर जखमी झाले. तर वृंदावन बसगाडी आगाराजवळ श्रीरंग सोसायटी येथे पडझड झालेले वृक्ष बाजूला करताना अग्निशमन दलाचे कर्मचारी अंकित यादव (३२) यांच्या पायाला कटर यंत्र लागून त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरु होते.
भिवंडी येथे तीन बत्ती भाजी मार्केट, गुलजार कोर्डिंग हाऊस, बंदर मोहल्ला, देवजी नगर, ईदगाह परिसरात पाणी साचले. ईदगाह आणि देवजी नगर भागात १५० ते २०० घरांमध्ये कंबरेइतके पाणी शिरले होते. त्यामुळे येथील नागरिकांना त्यांच्या नातेवाईकांकडे राहण्याची सूचना महापालिकेने केली होती. तर काही नागरिक तेथे राहत असल्याने भिवंडी महापालिकेने त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यास सुरुवात केली. सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमराास देवजीनगर येथे १२ वर्षीय मुलगा त्याच्या चार मित्रांसोबत खेळत असताना पाण्यात वाहून गेला.
कल्याण येथील कोळसेवाडी भागात चाळीतील घर कोसळून महिला जखमी झाली. मोहने ते मोहिली, रायते येथील जुना पूल, टिटवाळा येथील काळू नदीवरील रुंदे पूल पावसामुळे पाण्याखाली गेले. टिटवाळा येथे बल्याणी रस्त्याचा काही भाग खचला. कल्याण, डोंबिवली येथे काही सखल भागात रहिवाशांच्या घरामध्ये पाणी शिरले होते.
ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरण क्षेत्रातील पावसामुळे धरणातील पाणीसाठ्याने ३० टक्क्यांचा टप्पा ओलांडला. सोमवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास उल्हासनदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे बदलापूर शहरात पुराचे संकट निर्माण झाले. कल्याण तालुक्यातील काळू नदी तसेच शहापूर तालुक्यातील भातसा नदीची पाणीपातळी धोक्याच्या पातळीपेक्षा कमी होती. धरणांमधील पाणीसाठा आणि विसर्गाची माहितीही नियमितपणे घेतली जात असून, परिस्थितीनुसार आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येईल असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. शहापूर तालुक्यातील तुते गावाच्या पुलावरून पाणी जात असल्याने येथील साजिवली, सावरशेत, सरलांबे, तुते यासह अनेक गावांचा संपर्क तुटला. तसेच वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. सापगाव येथील भातसा आणि भारंगी नद्यांनी धोक्याची पातळी गाठली. कसारा घाट परिसरात रेल्वे मार्गावर दरड पडली होती. त्याचा परिणाम मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर झाला होता. आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देण्यासाठी ‘एनडीआरएफ’च्या दोन तुकड्या आणि ३० अधिकारी व जवान ठाणे जिल्ह्यात तैनात करण्यात आले आहेत.
जखमी पांडुरंग भुवड यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून सध्या ते डाॅक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेत आहे. – सौरभ राव, आयुक्त, ठाणे महापालिका.
