ठाणे : भिवंडी येथील रांजनोली भागात शिधावाटपाचा काळाबाजार केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला. दुकानदार पियुश ठक्कर, रमेश भानुशाली आणि ट्रक चालक रविकिशन सिंग यांच्याविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हे अन्वेषण शाखेने दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला.
शिधापत्रिका धारकांना वाटप केले जाणारे अन्नधान्य योग्य पद्धतीने वितरित करण्याऐवजी त्याचा काळा बाजारात विक्री करण्यासाठी एक ट्रक रांजनोली भागातून जात असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या भिवंडी पथकाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तो ट्रक अडविला.
ट्रकमध्ये एक लाख ४९ हजार रुपये किमतीचे अन्नधान्य आढळून आले. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात रविकिशन, पियुश आणि रमेश या तिघांविरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम ३१८ (४), ३ (५) सह जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३,७,९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.