केंद्र शासनाच्या अग्निपथ योजनेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आज (सोमवार) दुपारी ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे या महामार्गावरील नितीन कंपनी चौकातील उड्डाणपूलावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीत शालेय विद्यार्थ्यांच्या वाहनासह इतर वाहने सुमारे दहा ते पंधरा मिनिटे अडकून पडली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल झाले.

पूर्व द्रुतगती महामार्गावरून हजारो वाहने मुंबईच्या दिशेने वाहतूक करतात. आज (सोमवारी) दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवरील नितीन कंपनी उड्डाणपूलाच्या पथ्याशी वाहतूक रोखून धरली. त्यामुळे उड्डाणपूलावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना उड्डाणपूलावर खोळंबून राहावे लागले. उड्डाणपूलावर शालेय बसगाड्या अडकून पडल्या होत्या. विवियाना मॉल पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर पोलिसांनी आंदोलकांना बाजूला करून येथील वाहतूक सुरळीत केली.