ठाणे – आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या वाटेवर लाखो वारकऱ्यांचा महासागर हा ओसंडून वाहत आहे. या भक्तिभावाच्या लाटेत सहभागी होऊन अनेकजण आपापल्या पद्धतीने सेवा देतात. कुणी अन्नदान करतं, कुणी पाणी वाटतं, कुणी औषधोपचार देतो. परंतू, यावर्षी ठाण्यातील एका तरुणाने आपल्या व्यवसायातील कौशल्याचा उपयोग करून, विठ्ठलाच्या चरणी एक अनोखी सेवा अर्पण केली आहे.
ठाणे शहरातील रवीज द फॅमिली सलूनच्या माध्यमातून रवींद्र वाघमारे आणि त्यांच्या टीमने लोणंद (तरडगाव) येथे रस्त्यावर केस कर्तनालय उभारले. पंढरपूरच्या वाटेकडे चालणारे वारकरी त्याठिकाणी येताच रवीज द फॅमिली सलूनच्या टीम ने वारकऱ्यांचे केसं कापून देणे दाढी करून देण्याची मोफत सेवा दिली. जवळपास ८० ते १०० वारकऱ्यांना ही सेवा देण्यात आली.
ही सेवा म्हणजे केवळ कात्रीचा स्पर्श नव्हता. तर, वारकऱ्यांच्या थकलेल्या चेहऱ्यावर आलेली प्रसन्नता त्यांचे हास्य होते असे मत रवीज द फॅमिली सलूनच्या टीमने व्यक्त केले. या सेवेत रवींद्र यांच्यासोबत संस्थापक बापूराव वाघमारे, प्रशांत वाघमारे, अक्षय औटी, श्रीपाद पवार, संगीता दिघे आणि इतर टीम सदस्यांनीही आपला सहभाग दिला.
हा व्यवसाय नव्हता तर एक भावना होती
हे काम केवळ व्यवसाय नव्हते, तर ती एक भावना होती. आपल्याला जे जमते, त्यातूनच देवाची सेवा करायची, असा त्या मागचा उद्देश असल्याचे रवीज द फॅमिली सलूनच्या रवींद्र वाघमारे यांनी सांगितले.