Mumbai Metropolitan Region Housing Infrastructure Development: राज्यातील गृहनिर्माण विकासात ठाणे जिल्हा हा मुंबई शहर आणि मुंबई उपनगरांना मागे टाकत दुसऱ्या क्रमांकांवर आला आहे. महारेरा प्राधिकरणाने दिलेल्या विस्तृत आकडेवारीतून ही माहिती मिळाली आहे.
गेल्या एक वर्षाच्या कालावधीत महारेराने राज्यभरात १० हजार गृहनिर्माण प्रकल्पांना विविध मंजुरी दिली असून यात पुणे जिल्ह्यात ३१५० प्रकल्पांचा समावेश असून त्या खालोखाल १७१४ प्रकल्पांसह ठाणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असून मुंबई शहर आणि मुंबई उपनगरीय भागात घर घेऊ इच्छिणारी कुटुंब आता ठाणे जिल्ह्याला पसंती देऊ लागल्याचे स्पष्ट होत आहे.
मुंबईत वाढती लोकसंख्या, मर्यादित भूखंड आणि घरांच्या गगनाला भिडलेल्या किमती या पार्श्वभूमीवर नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणावर ठाण्याकडे वळत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. परिणामी, ठाणे जिल्हा हा केवळ उपनगर न राहता स्वतंत्र आणि सक्षम निवासी पट्टा म्हणून विकसित होत आहे. गेल्या काही वर्षांत ठाण्यात नियोजनबद्ध पद्धतीने मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण प्रकल्पांची उभारणी झाली आहे. मोठ्या टाउनशिप्स, विविध सोयी सुविधा, तसेच मध्यमवर्गीय आणि परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पांमुळे सर्व स्तरांतील नागरिकांना येथे पर्याय उपलब्ध होत आहेत.
त्यासोबतच जिल्ह्यात सध्यस्थितीत मेट्रो उभारणीला गती मिळत आहे. तर काही मेट्रो प्रकल्प सुरू झाले आहेत. याच समवेत रेल्वे आणि रस्ते जाळ्याचा विस्तार, शैक्षणिक संस्था, आरोग्य सुविधा आणि व्यावसायिक केंद्रांची वाढ यामुळे ठाण्याचा सर्वांगीण विकास वेगाने होत आहे.
ठाणे शहरापुरता हा विकास मर्यादित न राहता कल्याण-डोंबिवली पट्टा आणि त्यापुढील भागांपर्यंत विस्तारला आहे. विशेषतः अंबरनाथ आणि बदलापूर या परिसरांत गृहनिर्माण प्रकल्पांची संख्या झपाट्याने वाढत असून, त्या अनुषंगाने पायाभूत सुविधांची उभारणीही वेगाने सुरू आहे.
रस्ते, पाणीपुरवठा, स्थानिक वाहतूक व्यवस्था आणि नागरी सुविधा यामध्ये होत असलेल्या सुधारणांमुळे हे भाग नव्या निवासी केंद्रांच्या रूपाने पुढे येत आहेत. मुंबईत घर खरेदी करणे अनेकांसाठी परवडण्याबाहेर जात असताना, तुलनेने कमी किमतीत अधिक प्रशस्त आणि सुविधा-संपन्न घरांचा पर्याय ठाण्यात उपलब्ध होत आहे. त्यामुळे कामानिमित्त मुंबईत येणारे तसेच दीर्घकालीन वास्तव्यासाठी घर शोधणारे नागरिक ठाण्याकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहेत. याचा थेट परिणाम म्हणून ठाण्यातील गृहनिर्माण क्षेत्रात सातत्याने वाढ होताना दिसत आहे.
एकूणच, एमएमआर क्षेत्रातील गृहनिर्माण नकाशावर ठाणे जिल्हा अधिकाधिक ठळक होत असून, आगामी काळातही या वाढीचा वेग कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत. नियोजनबद्ध विकास, वाढती मागणी आणि सुधारणारी पायाभूत सुविधा यांच्या जोरावर ठाणे जिल्हा हा मुंबईनंतरचा प्रमुख निवासी आणि गुंतवणुकीचा केंद्रबिंदू म्हणून उदयास येत असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
एक वर्षात ( २०२५ – २०२६ ) मंजूरी मिळालेले गृहनिर्माण प्रकल्प
- एमएमआर क्षेत्र एकूण – ५ हजार ४९४
- ठाणे – १७१४
- मुंबई उपनगर – १६९६
- रायगड – ९३९
- पालघर – ५६८
- मुंबई शहर – ३७५
- रत्नागिरी – १३४
- सिंधुदुर्ग – ६८
