ठाणे : गेल्याकाही महिन्यांपासून वाहतुक कोंडी आणि रस्त्यांच्या वाईट स्थितीमुळे जिल्ह्यातील नागरिक हैराण झाले असताना दुसरीकडे ठाणे जिल्ह्यात वाहनांच्या संख्येत मात्र वाढ होत आहे. मागील सहा महिन्यात ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि वाशी या तीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत (आरटीओ) एक लाखाहून अधिक वाहनांची नोंदणी झाली.
सर्वाधिक नोंदणी ठाणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली आहे. अरुंद रस्ते, अपुऱ्या पायाभूत सुविधा, अपुरी सार्वजनिक वाहतुक व्यवस्था यामुळे वाहतुक व्यवस्थेचा बोजवारा उडण्याची शक्यता वाहतुक तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
मुंबई पाठोपाठ ठाणे जिल्ह्यात नागरिकरण वाढत आहे. ठाणे शहरातील घोडबंदर पट्टा, नवी मुंबई आणि तसेच कल्याण येथे नव्याने निवासी बांधकाम प्रकल्प उभी राहत आहेत. त्यामुळे भाडेतत्त्वावर किंवा मुंबईच्या जवळची शहरे असल्याने नोकरदार, व्यवसायिक गृहखरेदीस या भागात प्राधान्य देतो. परंतु गृहखरेदीसोबतच, वाहन खरेदीच्या संख्येतही जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे स्पष्ट होते.
परिवहन विभागाच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार जिल्ह्यात मागील सहा महिन्यांत म्हणजेच, १ जानेवारी ते ३० जून या कालावधीत एक लाख १९ हजार ६०३ इतक्या वाहनांची नोंदणी झाली आहे. सर्वाधिक वाहनांची नोंदणी ठाणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत झाली असून ती संख्या ५२ हजार ८७० इतकी आहे.
ठाणे परिवहन कार्यालय अंतर्गत ठाणे, भिवंडी ही शहरे येतात. ठाणे आणि भिवंडी या शहरात वाहतुक कोंडीमुळे नागरिक बेजार झाले आहेत. त्यात वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याने त्याचा परिणाम शहरातील वाहतुक व्यवस्थेवर प्रत्यक्ष बसत असल्याचे दिसून येते.
ठाण्याप्रमाणे कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई शहरातही वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयअंतर्गत ४५ हजार ४५३ तर वाशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत नवी मुंबई शहरात २१ हजार २८० नव्या वाहनांची नोंद झाली आहे.
तर २०२४ मध्ये याच सहा महिन्यांच्या कालावधीत एक लाख १० हजार ६३१ इतक्या वाहनांची नोंदणी जिल्ह्यात झाली. तर २०२३ मध्ये सहा महिन्याच्या कालावधीत ९४ हजार ७८१ इतक्या वाहनांची नोंदणी होती.
१ जानेवारी ते ३० जून (२०२५)
ठाणे – ५२,८७०
कल्याण – ४५,४५३
वाशी – २१,२८०
१ जानेवारी ते ३० जून (२०२४)
ठाणे – ४८,२८०
कल्याण – ४२,०९८
वाशी – २०,२५३
१ जानेवारी ते ३० जून (२०२३)
ठाणे – ४०,७७०
कल्याण – ३५,९२८
वाशी – १८,०८३
वाहतुकीच्या प्रश्नावर लक्ष देण्याची लोकप्रतिनिधींमध्ये इच्छाशक्ती नाही. केवळ बांधकामे वाढवून वाहतुक व्यवस्थेवर तोडगा निघत नाही. सरकारने सार्वजनिक वाहतुक व्यवस्था बळकट करणे आवश्यक आहे. जनतेला विश्वासात घेऊन पेट्रोलवर कर किंवा वाहनाविषयी इतर कर वाढविण्यावर विचार करायला हवा. राज्यात किती वाहने असावीत यावर निर्णय राज्य सरकार घेऊ शकते. – सुलक्षणा महाजन, शहर नियोजनतज्ज्ञ.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
वाहनसंख्या मागील काही वर्षांत अफाट वाढली आहे. वाहन कर्जाचे सुलभ हप्ते उपलब्ध होत असल्याने नवीन वाहन खरेदी वाढत आहे. शासनाने यात काहीतरी तोडगा काढणे आवश्यक आहे. – श्रीनिवास घाणेकर, सामाजिक कार्यकर्ते.