ठाणे : ‘लोकसत्ता लोकांकिका’ची ठाणे विभागीय अंतिम फेरी आज, रविवार १४ डिसेंबर रोजी ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे दुपारी साडेतीनपासून रंगणार आहे. या वेळी पाच एकांकिकांचे सादरीकरण होणार असून, सर्वोत्कृष्ट एकांकिकेला महाअंतिम फेरीत ठाणे विभागाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे पाचही महाविद्यालयातील कलाकार मंडळी दमदार सादरीकरणासाठी सज्ज झाले आहेत.
विविध सामाजिक विषयांना उत्तम कथा, अभिनय आणि संगीताची साथ देत उत्कृष्ट एकांकिकेचे सादरीकरण ठाणे विभागीय प्राथमिक फेरीत पाहायला मिळाले होते. या फेरीत सादर झालेल्या आठ पैकी पाच एकांकिका ठाणे विभागीय अंतिम फेरीसाठी निवडण्यात आल्या. विशेष म्हणजे, प्राथमिक फेरीत एकांकिका सादर केल्यानंतर परीक्षकांनी कलाकारांना त्यांच्या एकांकिकेतील त्रुटींबद्दल मार्गदर्शन केले होते.
त्या अनुषंगाने एकांकिकेत आवश्यक ते बदल करण्यासह संहितेचे वाचन, अभिनयाची तालीम तसेच तांत्रिक गोष्टींवर भर देत सर्व कलाकारमंडळींनी अंतिम फेरीसाठी कसून तयारी केली आहे. त्यामुळे या पाचपैकी कोणत्या महाविद्यालयाची एकांकिका महाअंतिम फेरी गाठते, याकडे लक्ष लागले आहे.
अंतिम फेरीत सादर होणाऱ्या एकांकिका
– श्री सिद्ध ठाकुरनाथ महाविद्यालय, उल्हासनगर : ‘पाकिटमार रंगमंच’
– जोशी-बेडेकर महाविद्यालय, ठाणे : ‘मढं निघालं अनुदानाला’
– चांगू काना ठाकूर महाविद्यालय, पनवेल : ‘किचकवध पुन्हा’
– आदर्श कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, बदलापूर : ‘बिट्विन द डोअर’
– सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे : ‘थिम्मक्का’
सर्वांना प्रवेश, काही जागा निमंत्रितांसाठी राखीव
● ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची ठाणे विभागीय अंतिम फेरी रविवार, १४ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० पासून डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे रंगणार आहे.
● याच ठिकाणी प्रेक्षकांना नि:शुल्क प्रवेशिका विभागीय अंतिम फेरी सुरू होण्याच्या अर्धा तास आधी देण्यात येतील. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य.
● एका व्यक्तीला एकच प्रवेशिका देण्यात येईल. तर काही जागा निमंत्रितांसाठी राखीव असतील.
पुण्यातून ‘वामन आख्यान’ महाअंतिम फेरीत
पुणे : मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंडच्या ‘वामन आख्यान’ या एकांकिकेने पुणे विभागीय अंतिम फेरीत प्रथम पारितोषिक पटकावून मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. विभागीय प्राथमिक फेरीतील सर्वोत्कृष्ट ठरलेल्या सहा एकांकिकांची विभागीय अंतिम फेरी शनिवारी टिळक स्मारक मंदिर येथे झाली. अभिनेता सौरभ गोखले आणि अभिनेत्री पौर्णिमा मनोहर यांनी अंतिम फेरीचे परीक्षण केले. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘उत्तर’ या चित्रपटाचे दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन, अभिनेता अभिनय बेर्डे यांनीही अंतिम फेरीला आवर्जून हजेरी लावून प्रेक्षकांशी संवाद साधला.
कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये आज विभागीय अंतिम फेरी
‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागीय अंतिम फेरी रविवारी रंगणार आहे. महाअंतिम फेरी गाठण्यासाठी महाविद्यालयांमध्ये चुरस होणार आहे. कोल्हापुरातील गोविंदराव टेंबे रंगमंदिर, देवल क्लब येथे पाच संघांमध्ये विभागीय अंतिम फेरी रंगणार आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात पाच संघांचे सादरीकरण रविवारी सकाळी १० वाजल्यापासून संत एकनाथ रंगमंदिराच्या सभागृहात होणार आहे.
