ठाणे : शहरात गेल्या महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसामुळे अनेक वृक्षांच्या फांद्या तुटून पडल्या होत्या. तर काही ठिकाणी ठाणे महापालिकेने वृक्षांची छाटणी केली. परंतु छाटणी केलेल्या वृक्षांचे खोड, फांद्या रस्त्यावरून उचलल्या जात नसल्याने वाहन चालकांना तसेच पदपथ किंवा रस्त्यावरून पायी जाणाऱ्या नागरिकांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे. मिनाताई ठाकरे चौकातील उड्डाणपूलावर वृक्षांचे ओंडके ठेवले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळेत भीषण अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर पदपथावर रचून ठेवलेल्या हरित कचऱ्यामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे.

ठाणे शहरात मे महिन्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला होता. या पावसामुळे शहरात मोठ्याप्रमाणात वृक्ष उन्मळून पडले होते. वृक्षांच्या फांद्या देखील तुटून पडल्या होत्या. तर काही वृक्षांच्या फांद्या धोकादायक स्थितीत होत्या. त्यामुळे ठाणे महापालिकेने या वृक्षांची छाटणी केली होती. पंरतु या वृक्षांच्या फांद्या अनेक ठिकाणी पदपथ आणि रस्त्याकडेला तशाच पडल्या आहेत. त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. शहरातील मिनाताई ठाकरे चौकातील उड्डाणपूल हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. घोडबंदर, माजिवडा भागातून हजारो वाहने या मार्गाने खोपट, हरिनिवास आणि ठाणे स्थानकाच्या दिशेने वाहतूक करतात. सुमारे दोन आठवड्यापूर्वी उड्डाणपूलालगत असलेल्या वृक्षांच्या फांद्या पुलालगत लोंबकळत असल्याने महापालिकेने येथील फांद्यांची छाटणी केली. ही छाटणी केल्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वृक्षांच्या फांद्या, ओंडके तसेच उड्डाणपूलालगत ठेवल्या आहेत. त्यामुळे येथील वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. फांद्या रस्त्यावर इतरत्र पसरत असल्याने भीषण अपघाताची भिती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा…ठाण्यात नव्या खासदारांच्या बैठकीला भाजपची दांडी

पूर्व द्रुतगती महामार्गाजवळील माजिवडा येथील पदपथावरही अशाचप्रकारे छाटणी केल्या फांद्या रचून ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे बसथांब्याच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना सहन करावा लागत आहे. राम मारूती रोड येथील एका मार्गालगत मागील अनेक दिवसांपासून फांद्या पडल्या आहेत. त्यातील काही फांद्या सुकून परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, कोलशेत, ढोकाळी भागासह इतर परिसरात देखील अशीच स्थिती आहे.यासंदर्भात ठाणे महापालिकेचे वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील यांना संपर्क साधला असता, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

हेही वाचा…ठाणे : लाचेची रक्कम घेऊन पोलीस कर्मचाऱ्याचे पलायन

रस्त्याकडेला ठेवण्यात आलेला हरित कचरा महापालिकेने तात्काळ रस्त्यावरून बाजूला करणे आवश्यक आहे. मिनाताई ठाकरे उड्डाणपूलावर पथदिवे नसल्यास वाहन चालकांचा भीषण अपघात होऊ शकतो. मागील दोन आठवड्यांपासून हरित कचरा या ठिकाणी पडून आहे. – अनिकेत सावंत, वाहन चालक.