लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : ठाणे शहरातील तलावांमध्ये गणेशमुर्ती विसर्जनामुळे प्रदुषण होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाकडून कृत्रिम तलावांची निर्मीती केली होती. या तलावांसह विशेष टाकी आणि फिरत्या विसर्जन व्यवस्थेंतर्गत गणेशमुर्तीचे विसर्जन करत ठाणेकरांनी पालिकेच्या पर्यावरणपुरक गणेशोत्सव संकल्पनेला प्रतिसाद दिल्याचे चित्र दिसून आले. याशिवाय, विसर्जनस्थळांवरून २५ टन निर्माल्य संकलित झाले असून या निर्माल्‍यावर प्रक्रिया करून त्‍याचे सेंद्रीय खत तयार केले जाणार आहे.

ठाणे शहराला तलवांचे शहर म्हणून ओळखले जाते. शहरात एकेकाळी ६० हून अधिक तलाव होते. परंतु अतिक्रमणामुळे अनेक तलाव नामशेष पावले असून सद्यस्थितीत ३६ तलाव शिल्लक राहिले आहेत. यामुळे तलावांचे शहर ही ओळख टिकविण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील तलावांमध्ये गणेशमुर्ती विसर्जनामुळे प्रदुषण होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाकडून पर्यावरणपुरक गणेशोत्सव संकल्पना राबविण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या या संकल्पनेंत शहरांमध्ये गणेशमुर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची करत असून यंदाही पालिकेने शहरात कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे.

आणखी वाचा- ठाण्यात शीर धडवेगळे करून एकाची हत्या

ठाणे महापालिकेने तयार केलेल्या विसर्जन व्यवस्थेला ठाणेकराकंडून प्रतिसाद मिळू लागला आहे. यंदा ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ३९ हजार ७५५ गणेशमुर्तीचे विसर्जन झाले आहे. त्यापैकी २० हजार ३८ गणेश मुर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन झाले आहे. याशिवाय, विशेष टाकी उपक्रमांतर्गत ३ हजार ३५१ तर, ९९ गणेशमुर्तींचे विसर्जन झाले आहे. यामुळे यंदाही ठाणेकरांनी दिड, पाच आणि गौरी-गणपतीचे कृत्रिम तलावात विसर्जन करून पालिकेच्या पर्यावरणपुरक गणेशोत्सव संकल्पेला प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. दीड दिवसाच्या गणेश मूर्ती विसर्जनावेळी सुमारे १२ टन निर्माल्य संकलन झाले होते. तर, सहा दिवसाच्‍या गणेश मूर्ती व गौरी मूर्ती विसर्जनादरम्यान सुमारे १३ टन निर्माल्‍य संकलित झाले आहे. या निर्माल्‍यावर प्रक्रिया करून त्‍याचे सेंद्रीय खत तयार केले जाणार आहे.

ठाणे महापालिकेने एकूण १० ठिकाणी गणेश मूर्ती स्वीकार केंद्र उभारली आहेत. जेल तलाव, मढवी हाऊस-राममारुती रोड, महागिरी कोळीवाडा, टेंभी नाका, रिजन्सी हाईट्स-आझादनगर, लोढा लक्झेरिया, कामगार हॉस्पिटल, किसन नगर बस स्टॉप, मॉडेला चेक नाका, देवदया नगर-शिवाई नगर या १० ठिकाणी मूर्ती स्वीकृती केंद्रे आहेत. प्राप्त झालेल्या २५९ गणेश मूर्तीं महापालिकेने कृत्रिम तलावांमध्ये विधिवत विसर्जन केले.

आणीखी वाचा- कल्याण-डोंबिवलीत गणपती विसर्जन मिरवणुकांवर १८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

फिरती आणि टाकी विसर्जन व्यवस्था

नौपाडा-कोपरी, माजिवडा-मानपाडा, वागळे आणि वतर्कनगर या चार प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये फिरती विसर्जन व्यवस्था करून देण्यात आली आहे. सकाळी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रभाग समितीमधील विविध ठिकाणी ठराविक काळासाठी हे फिरते वाहन विसर्जन व्यवस्थेसह उपलब्ध करून देण्यात येते. त्यावरील टाकीमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येते. यामध्ये ९९ गणेशमुर्तीचे विसर्जन करण्यात आले. गेल्यावर्षीपासून महापालिकेने कृत्रिम तलावांच्या सोबतीने छोट्या टाक्यांचीही व्यवस्था विसर्जनासाठी केली होती. त्यानुसार, गेल्यावर्षी ४२ ठिकाणी टाक्यांची सुविधा उपलब्ध होती. ती संख्या यंदा ४९ एवढी करण्यात आली आहे. त्यात ३ हजार ३५१ गणेशमुर्तीचे विसर्जन करण्यात आले.

कृत्रिम तलावांची व्यवस्था

आंबेघोसाळे, मासुंदा दत्त घाट, खारीगाव, घोलाई नगर, दातिवली तलाव, खिडकाळी तलाव, न्यू शिवाजी नगर कळवा तलाव, निळकंठ वूड्स- टिकूजीनी वाडी, रेवाळे, बोरिवडे, ब्रम्हांड ऋतू पार्क, हिरानंदानी रायलादेवी-१, रायलादेवी-२, उपवन तलाव परिसर-वर्तकनगर, देवदयानगर अशा १५ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे.

विसर्जनाची आकडेवारी

विर्सजन स्थळ (संख्या) – मूर्तींची संख्या

कृत्रिम तलाव (१५) – ८७००
खाडी विसर्जन घाट (९) – १४,५३१
विशेष टाकी व्यवस्था (४९) – ३३५१
फिरती विसर्जन व्यवस्था (०६) – ९९
मूर्ती स्वीकृती केंद्र (१०) – २५९
एकूण – ३९,७५५