Thane Ring Metro Protest: ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पास नागरिकांकडून गेल्या काही दिवसांपासून विरोध होऊ लागला असतानाच, आता या प्रकल्पाविरोधात रविवार, ३० ऑगस्ट रोजी नागरिक रस्त्यावर उतरून स्वाक्षरी मोहीम राबविणार आहेत. या प्रकल्पाची गरज नसल्याचा दावा करत तो रद्द करून त्याऐवजी धरणं, विद्युत बसगाड्या घेण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. या मागणीकडे संबंधित प्राधिकरणांचे लक्ष वेधण्यासाठीच ही स्वाक्षरी मोहिम राबविली जाणार आहे.

ठाण्यातील पोखरण रस्ता क्रमांक २ येथील आशर इन्फिनिटी, प्रशांत कॉर्नरजवळ येथे रविवार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ही स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली आहे. ॲड. राधिका राणे-शेडगे यांनी या आंदोलनासाठी पुढाकार घेतला आहे. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना काळ्या रंगाचा ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे. रिंग मेट्रोच्या प्रकल्पास विरोध करण्यासाठी या मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

रिंग मेट्रोच्या मार्गिका प्रकल्पामुळे शहरातील नागरिकांना अंतर्गत सार्वजनिक वाहतूकीचा नवा पर्याय उपलब्ध होईल, असे दावे प्रशासनाकडून केले जात आहेत. या प्रकल्पाच्या कामालाही सुरूवात झाली आहे. यासाठी जागोजागी मार्गरोधक लावण्यात आले आहेत. मात्र, या प्रकल्पाचा फारसा फायदा ठाणेकरांना होणार नसून या प्रकल्पाच्या कामामुळे ठाणेकरांना गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. संकुलांच्या प्रवेशद्वारासमोरच स्थानकाची उभारणी केली जाणार असल्याने त्यास विरोध होत आहे.

या प्रकल्पाची गरज नसल्याचा दावा करत तो रद्द करून त्याऐवजी धरण, विद्युत बसगाड्या घेण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. या मागणीकडे संबंधित प्राधिकरणांचे लक्ष वेधण्यासाठीच आता स्वाक्षरी मोहिम राबविली जाणार आहे, अशी माहिती ॲड. राधिका राणे-शेडगे यांनी दिली. ठाणेकरांना खड्डेमुक्त रस्ते, पाण्यासाठी धरण आणि वाहतूकीसाठी विद्युत बसगाड्यांची गरज आहे. अंतर्गत मेट्रोमुळे नागरिकांना घर ते कार्यालयपर्यंतच्या प्रवासाची सुविधा मिळणार नाही. त्यामुळे या प्रकल्पाची गरज नाही, असे त्यांनी म्हटले. विशेष म्हणजे, या मोहिमेला राजकीय स्वरूप येऊ नये यासाठी कोणतेही राजकीय बॅनर किंवा झेंडे आणू नयेत, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांच्या प्रश्नांसाठी नागरिकांनीच एकत्र यावे, असा संदेश या मोहिमेतून देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.