ठाणे : ‘सिटिझन्स फॉर सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट ठाणे’ या संस्थेच्या वतीने शहरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी प्रस्तावित वर्तुळाकार अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला विरोध करणारे फलक उभारण्यात आले आहेत. ठाणे शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या वर्तुळाकार अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला सामाजिक संस्था आणि काही नागरिकांकडून विरोध होत असतानाच, आता या प्रकल्पाविरोधातील जनजागृतीला वेग आला आहे.
या फलकांद्वारे प्रकल्पाच्या उपयुक्ततेबरोबरच पर्यावरणीय परिणाम आणि नागरिकांच्या विस्थापनाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. ‘वर्तुळाकार मेट्रो, गेम-चेंजर की पांढरा हत्ती?’, ‘पहिले पूर्ण करा मेट्रो चार, मग करा रिंग रेलचा विचार’, ‘कशासाठी होतोय रिंग मेट्रोचा हट्ट, ५ हजार खारफुटी आणि ३६०० झाडे होताहेत नष्ट’, ‘रिंग मेट्रो प्रकल्प ठरणार बेकार, ऐका हो तुम्ही ठाणेकरांची तक्रार’, अशा आशयाचे फलक शहरातील विविध भागांत लावण्यात आले आहेत. या फलकांमधून मेट्रो प्रकल्पाच्या खर्चाबरोबरच पर्यावरणावर होणारा परिणाम आणि नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
ठाणे शहरातील अंतर्गत मार्गांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या कामाला सुरुवातही झाली आहे. प्रकल्पाविरोधात मागील दोन दिवसांपासून शहरातील विविध भागांमध्ये हे फलक उभारण्यात आले आहेत. मुलुंड चेक नाका, उपवन, शिवाईनगर, हिरानंदानी मिडोज, वसंत विहार चौक, डॉ. काशिनाथ घाणेकर चौक, खेवरा चौक, ब्रह्मांड, ठाणे रेल्वेस्थानक परिसर, तीनहात नाका, हिरानंदानी इस्टेट आणि वागळे आगार परिसरात हे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
ठाणेकरांमध्ये जनजागृती
मेट्रो प्रकल्पाबाबत ठाणेकरांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि प्रकल्पाच्या पर्यावरणीय व सामाजिक परिणामांबाबत प्रश्न उपस्थित करण्यासाठी ही फलक मोहीम राबविण्यात आल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. या प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या व्यापक आंदोलनाचा हा एक भाग असल्याचेही संस्थेने स्पष्ट केले आहे.
