ठाणे : शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी प्रस्तावित १२,२०० कोटी रुपयांच्या अंतर्गत रिंग रूट मेट्रो प्रकल्पाला ‘वेक अप ठाणेकर’ या नागरिकांच्या संस्थेने विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पाऐवजी सुमारे दोन हजार कोटी रुपयांत अधिक परिणामकारक परिवहन व्यवस्था उभारता येईल, असा दावा संस्थेने केला आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे महापालिका आयुक्त सौरव राव यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

ठाणे शहरात अंतर्गत वाहतुकीसाठी रिंग मेट्रो सुरू करण्याची प्रक्रिया कार्यन्वित करण्यात आली आहे. हा प्रकल्प वेळखाऊ असून शहराच्या विद्यमान गरजांशी सुसंगत नसल्याचा दावा करण्यात आला असून निवेदनात १२,२०० कोटी रुपयांचा खर्च करूनही ठाणेकरांच्या वाहतूक समस्या सुटणार नाहीत. उलट प्रकल्पाच्या कामांमुळे पुढील दहा वर्षे नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागेल, असा आरोप संस्थेने केला आहे.

संस्थेने सुचविलेल्या उपाययोजना

रिंग मेट्रोऐवजी २० ते ३० आसनी इलेक्ट्रिक बस पाच ते दहा मिनिटांच्या अंतराने धावविणे, ठाणे रेल्वे स्थानक – तीन हात नाका – माजिवडा – बाळकूम – कापूरबावडी – वाघबीळ – कासारवडवली असा रिंग बसमार्ग विकसित करणे, गर्दीच्या वेळेत बससाठी स्वतंत्र मार्गिका राखीव ठेवणे, जीपीएस आणि डिजिटल भाडे प्रणालीसह बस व मेट्रो स्थानकांवर ई-रिक्षा हब उभारणे, सुरक्षित व दिव्यांगस्नेही पदपथ आणि स्कायवॉक उभारणे, सार्वजनिक सायकल सुविधा उपलब्ध करणे, प्रमुख वाहतूक केंद्रांवर बहुविध वाहतूक व्यवस्था एकाच ठिकाणी उपलब्ध करणे, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने सिग्नल व्यवस्था अद्ययावत करणे, ठाणे खाडीवरून नवी मुंबई आणि इतर परिसरासाठी फेरी सेवा सुरू करणे तसेच मोठ्या गृहनिर्माण संकुलांसाठी आणि आयटी पार्कसाठी ॲप आधारित शटल सेवा सुरू करणे, अशा दहा उपाययोजना संस्थेने सुचविल्या आहेत.

‘पर्यायांचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करा’

या सर्व उपाययोजनांवर दोन हजार कोटी रुपयांच्या आत खर्च होईल आणि त्यामुळे राज्य शासन व ठाणे महापालिकेचे सुमारे ८,२०० कोटी रुपये वाचतील, असा दावाही संस्थेने निवेदनात केला आहे. दरम्यान, महागड्या प्रकल्पाला अंतिम मंजुरी देण्यापूर्वी परिवहन तज्ज्ञ, नगररचनाकार आणि नागरिक संघटनांच्या प्रतिनिधींची उच्चस्तरीय समिती स्थापन करून या पर्यायांचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करावे, अशी मागणी वेक अप ठाणेकर तर्फे करण्यात आली आहे.